समुद्रात मृतदेह मिळालेल्या तरुणीची आत्महत्या

मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 ऑगस्ट 2025
मुंबई, – रविवारी उशिरा घरातून निघून गेलेली आणि सोमवारी दुपारी नरिमन पॉईट येथील समुद्रात मृतदेह मिळालेल्या मनिता तेजबल गुप्ता या 24 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आली. लग्नावरुन सुरु असलेल्या वादातून मानसिक नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. याप्रकरणी तिच्या पालकांची कफ परेड पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून मनिताच्या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

मनिता गुप्ता ही कफ परेड येथील गणेशमूर्ती, पार्ट क्रमांक तीन, गल्ली क्रमांक पाचमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. रविवारी सव्वाअकरा वाजता ती शौचालयात गेली होती, मात्र बराच वेळ होऊन ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींकडे चौकशी केली. मात्र मनिता कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी कफ परेड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मनिताची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत मिसिंग तक्रार नोंदवून तिचा शोध सुरु केला होता.

तिचा शोध सुरु असताना नरिमन पॉईट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून कफ परेड पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर कफ परेड पोलिसांनी अग्निमशन दलासह घटनास्थळी धाव घेतली होती. पाण्यातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर ती मिसिंग असलेली नमिता असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात तिच्या मृत्यूमागे घातपात नसून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

प्राथमिक तपासात मनिताचे तिच्याच गावच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते, मात्र त्याला नोकरीला नोकरी नव्हती, तो सध्या बेरोजगार होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या वृत्ताला कफ परेड पोलिसांनी दुजोरा दिला असला तरी अधिकृतपणे काहीही सांगण्यास नकार दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page