चीझ अ‍ॅनालॉगची पनीर म्हणून विक्रीचा पर्दाफाश

अ‍ॅण्टॉप हिल येथून 550 किलो हलक्या दर्जाचे पनीर जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 ऑगस्ट 2025
मुंबई, – चीझ अ‍ॅनालॉगची पनीर म्हणून विक्रीचा गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अ‍ॅण्टॉप हिल येथील दोन दुकानासह पार्किग केलेल्या टेम्पोमधून साडेपाचशे किलो हलक्या दजाच्या पनीरचा साठा जप्त केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नाही. जप्त केलेला पनीरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित दुकान मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होईल असे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांनी सांगितले.

अ‍ॅण्टॉप हिल येथील काही डेअरी मालकांकडून आरोग्यास हानीकारक तसेच अपायकारक अशा चीझ अ‍ॅनालॉगची मलाईयुक्त पनीर म्हणून विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रैशन यांनी गंभीर दखल घेत सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांना संबंधित डेअरी मालकाविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग बनसोडे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन बगाडे, महेश सांगळे, पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर बोरोले, सहाय्यक फौजदार प्रकाश आव्हाड, पोलीस हवालदार गणेश डोईफोडे, महिला पोलीस हवालदार रिचा मोरवेकर, पोलीस शिपाई संदीप वायळ, महिला पोलीस शिपाई अर्चना कासारकर, पोलीस शिपाई आकाश पवार यांनी अन्न व औषध विभागाच्या पथकासह अ‍ॅण्टॉप हिल येथील कारवाई केली होती. या परिसरातील ओम कोल्ड्रींग हाऊस आणि श्री गणेश डेअरी या दुकानासह दुकानासमोर पार्क केलेल्या टेम्पोमधून पोलिसांनी साडेपाचशे किलो इतक्या दर्जाचे पनीरचा साठा जप्त केला आहे.

हा साठा नंतर अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. त्याचा अहवाल आल्यांनतर संबंधित डेअरी मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. चीज अ‍ॅनालॉग उत्पादन करणारे दूध न वापरता दूधाची पावडर, हलक्या प्रतीचे पामतेल आणि केमिकल्सचा वापर करुन त्यावर प्रक्रिया करुन खाण्यासाठी अपायकार आणि हलक्या दर्जाचे पनीर तयार करतात. मुंबईतील विविध रेस्ट्रॉरंट, हॉटेल्स, डेअरी व केटरिंग व्यावसायिक, सर्वसामान्य लोकांना मलाईयुक्त पनीर या नावाने स्वस्त दरात विक्री करत होते.

मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ फक्त विश्वनीय दुकानातून किंवा ब्रॅडचे खरेदी करावेत आणि लेबल नीट तपासावे.
सेल-सुट्टे किंवा लेबल नसलेले पदार्थ खरेदी करणे टाळावेत
मलईयुक्त पनीररमध्ये दूधाचा नैसर्गिंक वास आणि दाणेदार पोत असते. बोगस पनीर रबरासारखे किंवा मेणासारखे जाणवते
भेसळयुक्त पनीर खाल्याने अन्न विषबाधा आणि आरोग्यास गंभीर धोके संभवतात
संशयास्पद विक्री-साठा आढळल्यास तातडीने पोलिसांना किंवा पोलीस नियंत्रण कक्षाचे 100 क्रमांकावर कळवावे. माहिती देणार्‍या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल
व्यापार्‍यांसाठी पोलिसांकडून संदेश
भेसळयुक्त अन्नपदार्थाचे उत्पादन-विक्री करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल
प्रामाणिक व्यापार्‍यांनी असे पदार्थ साठवणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page