लाचप्रकरणी सिडकोच्या महिला अधिकार्यासह दोघांना अटक
मूर्तीच्या जागेच्या एनओसीसाठी लाचेची मागणी महागात पडली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 ऑगस्ट 2025
नवी – गणपती आणि देवीच्या मूर्तीच्या जागेच्या एनओसीसाठी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी करुन तीस हजाराची लाच घेताना सिडकोच्या एका अधिकार्यासह दोघांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात सिडकोच्या क्षेत्रीय अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकूर आणि कंत्राटी कामगार योगेश अंबाजी कोळी यांचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या कारवाईचे वृत्त समजताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार एका खाजगी संस्थेचे सचिव म्हणून काम करतात. नवी मुंबईतील जुईनगर, सिडको प्लॉट क्रमांक पंधरा, सेक्टर 24 या ठिकाणी त्यांच्या संस्थेला गणपती आणि देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी 30 बाय 30 मंडप उभारण्यासाठी जागा हवी होती. त्यासाठी त्यांनी सिडको कार्यालयात अर्ज करुन जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. याच संदर्भात त्यांनी क्षेत्रीय अधिकारी स्मिता ठाकूर आणि कंत्राटी योगेश कोळी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या संस्थेला जागा देण्यासाठी एनओसी देण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ही लाच दिल्यानंतर त्यांच्याकडून एनओसी मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र लाचेची ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना तीस हजार रुपये देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. सोमवारी 25 ऑगस्टला या तक्रारीची संबंधित पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी गणपती आणि देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी जागा देण्याचे आश्वासन देऊन एनओसी देण्यासाठी पन्नास हजाराची लाचेची मागणी करुन तीस हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती.
दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी 26 ऑगस्टला या अधिकार्यांनी सिडको कार्यालयाजवळ सापळा लावला होता. यावेळी तीस हजाराची लाचेची रक्कम घेताना कंत्राटी कामगार योगेश कोळी याला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले होते. या गुन्ह्यांत स्मिता ठाकूर यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलीस उपअधिक्षक धर्मराज सोनके, पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ, पोलीस हवालदार जाधव, महिला पोलीस नाईक बासरे, पोलीस नाईक अहिरे, पोलीस शिपाई चौलकर यांनी केली.