मराठा आरक्षण व अमीत शहा यांच्या दौर्यामुळे मुंबई शहर हाय अलर्टवर
सर्वत्र कडेकोट बंदोबस्त; आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबईसह राज्यात गणेशोत्सावामुळे गणेशमय वातावरण असताना शुक्रवारी आझाद मैदानात होणार्या मराठा आरक्षण आंदोलन आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमीत शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर येत असल्याने मुंबई शहर हाय अलर्टवर आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला उसळणार्या गर्दीमुळे ऐन गणेशोत्सावात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी दक्षिण मुंबईत स्थानिक पोलिसांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सीसी कॅमेर्याच्या माध्यमातून आंदोलनावर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
27 ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, या सणाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेताना शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाची हाक दिली होती. या उपोषणाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली होती. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली होती. यावेळेस जरांगे-पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन माघार घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने या आंदोलनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी एक दिवसांची परवानगी दिल्याने राज्यभरात मोठ्या संख्येने मराठा समाज आझाद मैदानाकडे येत आहेत. गुरुवारी सकाळपासून मराठा समाजाचे कार्यकर्ते दक्षिण मुंबईत दाखल झाले होते.
रात्री उशिरापर्यंत ही संख्या अधिक वाढली होती. शुक्रवारी सकाळपर्यंत आझाद मैदानात लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी सकाळीच आझाद मैदानात दाखल झाली होती. या पथकाने संपूर्ण आझाद मैदानाची पाहणी करुन बंदोबस्ताची आखणी केली होती. या पथकासह मुंबई पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे सुमारे दोन ते अडीच हजार पोलीस तिथे बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी, बॉम्बशोधक व नाथक पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच वाहतूक पोलिसांची मदत घेतली जात आहे. आंदोलनामुळे काही मार्गात बदल करण्यात आले आहे. जागोजागी वाहतूक पोलिसांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. जेणेकरुन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ नये. जरांगे-पाटील हे नवी मुंबईमार्गे मुंबईत येत असल्याने जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथे वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असल्याने स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्तामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहेत. काही पोलिसांना साध्या वेशात गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. संशयित व्यक्तींची कसून चौकशी करा. चौकशीनंतर त्याच्याावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. स्वतच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी हे आझाद मैदानात हजर राहून बंदोबस्तातची पाहणी करणार आहे. तिथे काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून योग्य ती दखल घेण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन काहीजण कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने परिसरात सीसी कॅमेर्याच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. दुसरीकडे गणेशोत्सवात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची पुरेपुरे काळजी घेण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.
गणेशोत्सव, मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर येत आहे. शुक्रवारी अमीत शहा मुंबईत आल्यानंतर लालबागचा राजासह इतर प्रमुख गणेशोत्सव मंडळ, काही भाजप नेत्यांच्या घरी जाऊन दर्शन घेणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षेसह मुंबई पोलिसांनी अतिरिक्त तुकडी त्यांच्यासोबत ते जिथे जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची शुक्रवारी खरी परिक्षा असणार आहे. या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच बंदोबस्तात कुठेही हलगर्जीपणा होणार नाही यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत स्वत पोलीस आयुक्त देवेन भारती हे बंदोबस्ताबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगण्यात आले.