दिवसा रेकी करुन रात्री रिक्षा चोरी करणार्‍या आरोपीस अटक

रिक्षा चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करुन पाच रिक्षा हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा चोरी करणार्‍या एका सराईत आरोपीस घाटकोपर पोलिसांनी अटक केली. संजय ऊर्फ सागर बसंतलाल गुप्ता असे या 41 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने रिक्षा चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून सव्वापाच लाख रुपयांचे पाच चोरीच्या रिक्षा पोलिसांनी हस्तगत केले आहेत. रिक्षा चोरीसह त्याच्याविरुद्ध इतर नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार रिक्षाचालक असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहतो. 10 ऑगस्टला त्याची परिसरात पार्क केलेली रिक्षा अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्याने रिक्षा चोरीची तक्रार घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती. शहरात वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत घाटकोपर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, पोलीस हवालदार दिपक भारती, निलेश पवार, पोलीस शिपाई अमोल सूर्यवंशी, अजय अहिरे, बाळासाहेब गव्हाणे यांनी तपास सुरु केला होता.

परिसरातील सत्तरहून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यातील काही फुटेजमध्ये संजय गुप्ता दिसला होता. त्याने रिक्षा चोरी केल्याचे उघडकीस येताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना संजय गुप्ता हा विद्याविहार परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे दहा ते पंधरा दिवस साध्या वेशात पाळत ठेवत होती. विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ संजय आला असता त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने ही चोरी केल्याची कबुली देताना इतर चार रिक्षा चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. या रिक्षा त्याने घाटकोपर, खार, ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केले होते. चोरीच्या या पाचही रिक्षा नंतर पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्याची किंमत सुमारे सव्वापाच लाख रुपये आहे. तपासात संजय हा मूळचा उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर, चुणार, धनश्यामपूरचा रहिवाशी आहे. सध्या तो खार येथील कार्टर रोड, सीसीडी कॉफी डेजवळील फुटपाथवर राहत होता.

दिवसा रेकी केल्यानंतर तो रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा चोरी करत होता. रिक्षाचालक असलेला संजय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दिडोंशी, विनोबा भावे नगर, खार, पार्कसाईट पोलीस ठाण्यात नऊहून अधिक रिक्षा चोरीसह जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page