डिजीटल अरेस्टच्या नावाने गंडा घालणार्या दोघांना अटक
बँक खात्यामार्फत सायबर ठगांना कोट्यवधी रुपये ट्रान्स्फर केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 ऑगस्ट 2025
मुंबई, – डिजीटल अरेस्टच्या नावाने एका महिलेला सुमारे सव्वाकोटींना गंडा घातल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. रोहित संजय सोनार आणि हितेश हिमंत पाटील अशी या दोघांची नावे असून ते दोघेही जळगावचे रहिवाशी आहेत. या दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तसेच खात्यात जमा झालेले कोट्यवधी रुपये विदेशात वास्तव्यास असलेल्या सायबर ठगांना ट्रान्स्फर केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
यातील 72 वर्षांच्या वयोवृद्ध तक्रारदार महिला या पश्चिम उपनगरात राहतात. 18 ऑगस्टला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो पोलीस उपायुक्त संजय अरोरा असल्याचे सांगून त्यांचा गुन्हेगारी कृत्यांसह मनी लॉड्रिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यासह मुंबई आणि दिल्ली पोलीस, मुंबई उच्च न्यायालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांना या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखविण्यात आली होती. त्यांची चौकशी सुरु असल्याने त्यांना कोणाशी संपर्क साधता येणार नाही. त्यांना त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना काही बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
कारवाईला घाबरुन या महिलेने 18 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2028 या कालावधीत विविध बँक खात्यात सुमारे सव्वाकोटी रुपये ट्रान्स्फर केली होती. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर होताच त्यांची कोणीही चौकशी झाली नव्हती. चौकशीनंतर त्यांची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगूनही त्यांनी ती रक्कम तिच्या बँक खात्यात जमा केली नाही. चौकशीदरम्यान तिला तिची फसवणुक झाल्याचे समजले होते. त्यानंतर तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, पोलीस शिपाई केशव तकीक, विकास डिगे, प्रितम व्यवहारे यांनी तपास सुरु केला होता.
ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तपासात काही रक्कम रोहित याच्या खात्यात जमा झाली होती, या खात्याची माहिती हितेश पाटीलने विदेशात वास्तव्यास असलेल्या सायबर ठगांना दिली होती. ही रक्कम संबंधित ठगांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर या दोघांनाही ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्या अटकेसाठी एक टिम जळगाव येथे गेली होती.
या पथकाने रोहित सोनार आणि हितेश पाटील या दोघांनाही ताब्यात घेतले होते, चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली देताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर दोन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.