विक्री केलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक
76 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी फ्लॅटमालकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 ऑगस्ट 2025
मुंबई, – विक्री केलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एमओयू बनवून एका व्यक्तीची 76 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी जय रावजीभाई सोलंकी या फ्लॅटमालकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत अमीत दुबे, प्रविण आणि रविंद्र बाली हे तिघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौघांनी कट करुन तक्रारदारांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.
39 वर्षांचे गणेश रमेश हातीम हे विलेपार्ले येथील सहार गाव परिसरात राहत असून ते पॅसेंजर बोटीवर कामाला आहेत. त्यांना एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना युनिट होम या साईटवर विलेपार्ले येथील पार्क रोड, कमलेश मेंशनमध्ये एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची एक जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्यांनी जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना समोरील व्यक्तीने त्यांच्या गोरेगाव येथील कार्यालयात बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्यांची अमीत दुबे, प्रविण, रविंद्र बाली आणि जय सोलंकी यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी इतर तिघांनी जय सोलंकी यांच्या मालकीचा कमलेश मेंशन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्यांना त्यांच्या फ्लॅटची विक्री करायची आहे.
त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना फ्लॅट क्रमांक दहाचे शेअर सर्टिफिकेट, जय सोलंकी यांच्या नावाचे लाईट बिल, सोसायटीची एनओसीसह इतर दस्तावेज दाखविले होते. सर्व कागदपत्रे पाहिल्यांनतर त्यांनी तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा 75 लाखांमध्ये सौदा झाला होता. मार्च ते जुलै 2025 या कालावधीत ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या फ्लॅटसह रजिस्ट्रेशनसाठी टप्याटप्याने कॅशने बारा लाख आणि ऑनलाईन 63 लाख 85 हजार असे 75 लाख 85 हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र पेमेंटनंतर जय सोलंकी हे विविध कारण सांगून फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच ते कमलेश मेंशन अपार्टमेंटच्या सेके्रटरीकडे फ्लॅटबाबत चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांना सोसायटीच्या सेके्रटरीने जय सोलंकीने तो फ्लॅट या आधीच दिपक कोलगे या व्यक्तीस विक्री केल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी जय सोलंकीकडे विचारणा केली असता त्याने त्यांचा कॉल कट केला. त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. जय सोलंकीने अमीत दुबे, प्रविण आणि रविंद्र बाली यांच्या मदतीने विक्री झालेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची सुमारे 76 लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जय सोलंकीसह इतर तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दिड महिन्यांपासून फरार असलेल्या जय सोलंकी याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने याच फ्लॅटचा इतर कोणाशी व्यवहार केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.