शेताच्या वादातून वयोवृद्धाची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

कुठलाही पुरावा नसताना अल्पवयीन पुतण्यासह आत्तेभावाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ एप्रिल २०२४
कोल्हापूर, – शेताच्या वादातून ६५ वर्षांच्या वयोवृद्ध काकांची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अल्पवयीन पुतण्यासह त्याच्या आत्तेभावाला कुठलाही पुरावा नसताना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. गणेश परशुराम जिंगरुचे असे या आत्तेभावाचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी चंदगढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर अल्पवयीन पुतण्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या दोघांनी वसंत पाटील यांचे अपहरण करुन नंतर त्यांची निर्घृण हत्या करुन त्यांचा मृतदेह नदीत फेंकून पुरावा नष्ट केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सांगितले.

वसंत पाटील हे ६५ वर्षांचे वयोवृद्ध कोल्हापूरच्या चंदगड हाजगोळीचे रहिवाशी आहेत. २६ मार्चला ते त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत नव्हते. त्यांचा त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची चंदगढ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्यांच्या शेतात पोलिसांना काही रक्ताचे डाग दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आसपासच्या परिसरात वसंत पाटील यांचा शोध सुरु केला होता. २९ मार्चला पोलिसांना पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला. त्यांची गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकर्‍यांनी मृतदेह आंजहोळ नदीत फेंकून दिला होता. हा मृतदेह वसंत पाटील यांचाच असल्याचे उघडकीस येताच त्यांचा मुलगा नंदकुमार पाटील याच्या तक्रारीवरुन चंदगढ पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध अपहरणासह हत्या, हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक निकेफश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार चंदू नन्नवरे, अमोल कोळेकर, राजू कांबळे, समीर कांबळे, अमीत सर्जे, महेश गवळी, अमर आडुळकर, सोमराज पाटील, नामदेव यादव, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, सायबर सेलचे सुहास पाटील, अमर वासुदेव आणि सचिन बेंडखेळे यांनी तपासाला सुरुवात केली होती.

या गुन्ह्यांचा कुठलाही पुरावा मारेकर्‍यांनी मागे सोडला नव्हता. तरीही पोलिसांनी त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचे काम सुरु केले होते. या तपासात वसंत पाटील यांचे त्यांच्या नातेवाईकांसोबत शेतावरुन वाद सुरु होता. या वादातून त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचे त्यांच्या अल्पवयीन पुतण्यासोबत भांडण झाले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी पुतण्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्यानेच त्याचा साथीदार आणि आत्तेभाऊ गणेश परशुराम जिंगरुचे याच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघडकीस आले होते. गणेश हा मूळचा कर्नाटकच्या बेळगांव, सोनोलीचा रहिवाशी होता. त्यानंतर त्याला या पथकाने ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीत त्यांनी वसंत पाटील यांची प्रथम लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांच्याकडील विळ्याने त्यांची गळ्यावर वार करुन हत्या केली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह पोत्यात टाकून मृतदेह आंजहोळ नदीत फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी त्यांनी वसंत पाटील यांचे कपडे जाळून टाकले होते. गावात आल्यानंतर त्यांना काहीच माहिती नाही असे अर्विभावात वावरत होते. मात्र पोलिसांनी अल्पवयीन पुतण्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला बोलते केले आणि या हत्येचा पर्दाफाश झाला. याकामी त्याला गणेशने मदत केल्याने त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. पुतण्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर गणेशला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page