एसआरएमध्ये स्वस्तात फ्लॅटच्या नावाने आठजणांची फसवणुक
सव्वादोन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ एप्रिल २०२४
मुंबई, – अंधेरीतील इंदिरानगर परिसरातील एसआरएच्या साईकन्वल अपार्टमेंटमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका जोडप्याने आठजणांची सुमारे सव्वादोन कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी जोडप्यासह तिघांविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. श्रीनिवास शेट्टी, रेणुका शेट्टी आणि भूषण कदम अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेखा लक्ष्मण माने ही महिला अंधेरीतील चारबंगला, मनिष लोटस अपार्टमेंटमध्ये तिच्या मुलासोबत राहते. तिचे पती सेंट्रल प्रेसमध्ये नोकरीस होते. २०२१ साली त्यांचे निधन झाले होते. अंधेरीतील इंडियन ऑईलनगरसमोरील इंदिरानगरात साईकल्वल नावाची एक इमारत असून या इमारतीमध्ये जसपालसिंग सुरी या बिल्डरच्या मालकीचे बारा फ्लॅट होते. श्रीनिवास शेट्टी हा जयपालसिंग सुरीचा खास माणूस असून त्याच्याकडे या फ्लॅट विक्रीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे ते फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष तक्रारदार महिलेसह तिच्या पतीला देण्यात आले होते. त्यात पराग कदम आणि भूषण कदम यांनी मध्यस्थी केल्याने त्यांनी त्यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. काही दिवसांनी तिने पराग कदमची त्याच्या अंधेरीतील डी. एन नगर कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे प्रेस कॉलनीतील पाच रहिवाशी, श्रीनिवास शेट्टी आणि भूषण कदम आदी उपस्थित होते. यावेळी श्रीनिवासने सुरीने त्याला बारा फ्लॅटच्या विक्रीचे अधिकार दिले असून त्याच्याकडे त्याचे अधिकृत पत्र दाखविले. त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. बांधकाम साईटची पाहणी केल्यानंतर तिथे इमारतीचे बांधकाम सुरु होते. जागेचे लोकेशन आणि प्लॅटची पाहणी केल्यांनतर त्यांनी तिथे प्रत्येकी एक फ्लॅट घेण्याचे ठरविले होते. डिसेंबर २०१३ रोजी फ्लॅटचे आगाऊ पेमेंट केल्यानंतर त्यांच्यासोबत श्रीनिवासने एक करार केला होता. त्यानंतर भूषण कदमने श्रीनिवास व त्याची पत्नी रेणुका शेट्टी यांच्या वतीने त्यांच्याकडून उर्वरित पेमेंट घेतले होते. जून २०१४ पर्यंत रेखा माने हिने त्यांना ३७ लाखांचे पेमेंट दिले होते. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटमध्ये दुसरेच रहिवाशी राहत असल्याचे दिसून आले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने श्रीनिवास शेट्टीच्या कांदिवलीतील चारकोप येथील घरी जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांनी फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे करण्याची विनंती केली होती. त्यामुळे श्रीनिवासने त्यांना दहा लाख रुपये परत केले होते. यावेळी त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा लवकरच मिळेल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. विविध कारण सांगून तो त्यांना सतत टाळण्याचा प्रयत्न करत होता. ऑगस्ट २०१६ रोजी श्रीनिवास शेट्टी अचानक गायब झाला होता. त्यामुळे रेखा माने हिने पुन्हा इमारतीमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी तिला श्रीनिवास आणि रेणुकाने त्यांनी अलोट केलेले फ्लॅट परस्पर विक्री केल्याचे दिसून आले. याबाबत तिने रेणुका शेट्टीकडे जाब विचारला असता तिने तुमच्या पैशांतून आम्ही प्रॉपटी खरेदी केली आहे. तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली होती. श्रीनिवास, रेणुका आणि भूषण कदम यांनी तिच्यासह हर्षद धोंडीबा गुरव, प्रदीप पन्नालाल जैन, नितीन प्रफुल्ल सातघरे, विद्या सतीश वाकोडे, संजय सोनबा लिमकर, राकेश यशवंत खेडकर, परशुराम भाऊ सोनाळकर यांच्याकडून स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून २ कोटी २२ लाख ३० हजार रुपये घेतले. मात्र कोणालाही फ्लॅटचा ताबा न देता तसेच फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत न करता फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रेखा माने हिने डी. एन नगर पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्रीनिवास शेट्टी, त्याची पत्नी रेणुका श्रीनिवास शेट्टी आणि भूषण कदम यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.