मद्यप्राशन करुन चालविल्याप्रकरणी कारवाई करताना धिंगाणा
तीन महिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल तर दोघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 सप्टेंबर 2025
मुंबई, – मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याप्रकरणी एका आरोपीवर कारवाई करताना त्याच्या नातेवाईकांशी कर्तव्य बजाविणार्या पोलीस पथकाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कांदिवलीत परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन महिलांसह पाचजणांविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोन आरोपींना समतानगर पोलिसांनी अटक केली. अजय रमेश बामणे आणि गणेश बामणे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. या गुन्ह्यांत विद्या सोनावणे, विजया भट आणि वर्षा बामणे या तिन्ही महिला सहआरोपी असून या गुन्ह्यांत तिघींनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
ही घटना मंगळवारी 2 सप्टेंबरला रात्री पावणेबारा वाजता कांदिवलीतील आकुर्ली रोड सबवे, बिग बाजारजवळ घडली. गणेशोत्सवात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी आणि गस्तीवर अधिक दिला आहे. मंगळवारी रात्री समतानगर पोलीस ठाण्याचे एक पथक वाहतूक पोलिसांच्या मदतीने बिग बाजार परिसरात नाकाबंदी कर्तव्यावर हजर होते. यावेळी पोलीस शिपाई सुरवाळे यांना अजय बामणे हा मद्यप्राशन करुन वाहन चालवत असल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला उपस्थित पोलिसांनी थांबवून त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यावेळी अजयचे नातेवाईक असलेल्या विद्या सोनावणे, विजया भट, वर्षा बामणे आणि गणेश बामणे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.
अजयविरुदध कारवाई करु नये म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. त्यात पोलीस हवालदार सिद्धार्थ किणी, महिला पोलीस उपनिरीक्षक गरड, महिला शिपाई तांडले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला उपनिरीक्षक गरडे यांना नखाने ओरखडून कारवाई न करण्यासाठी वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणाया अजय बामणे आणि गणेश बामणे या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
याप्रकरणी पोलीस हवालदार सिद्धार्थ किणी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाचजणांविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणे, मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अजय बामणे आणि गणेश बामणे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या गुन्ह्यांत विजया भट, वर्षा बामणे आणि विद्या सोनावणे यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.