बॉम्बस्फोटाची धमकी देणार्या आरोपीस नोएडा येथून अटक
मानवी बॉम्बसह आरडीएक्सने स्फोट घडविण्याची दिली होती धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 सप्टेंबर 2025
मुंबई, – गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मुंबई शहरात बॉम्बस्फोटाची धमकी देणार्या एका 50 वर्षांच्या आरोपीस गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. आश्विनीकुमार सुरेश सुप्रा असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या नोएडाचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सघ्या पोलीस कोठडीत आहे. शुक्रवारीने त्याने मुंबई शहरात 34 आत्मघाती गाड्यामार्फत 400 किलो आरडीएक्सने बॉम्बस्फोटाची मालिका घडविणार असल्याची धमकी दिली होती. मात्र ही धमकी देणे त्याला चांगलेच महागात पडले आहे.
शनिवारी 6 सप्टेंबरला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणपती विसर्जन असल्याने शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जनाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच दरम्यान गुरुवारी 5 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन बॉम्बस्फोट होणार असल्याचा एक मॅसेज पाठविला होता. या मॅसेजमध्ये या व्यक्तीने 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्बच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडविणार आहे असे सांगून लष्कर-ए-जिहादी असा उल्लेख करुन शहरात चौदा अतिरेकी घुसले आहे. ते अतिरेकी 400 किलो आरडीएक्सच्या मदतीने बॉम्बस्फोटाची मालिका घडविणार आहे. त्यात एक कोटीहून अधिक नागरिक मारले जातील असे नमूद करण्यात आले होते.
या धमकीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनाराण चौधरी यांनी गंभीर घेतली होती. त्यामुळे या धमकीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो मॅसेज उत्तरप्रदेशातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेची एक टिम उत्तरप्रदेशला रवाना झाली होती. या पथकाने उत्तरप्रदेशच्या नोएडा, गौतम बुद्ध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आश्विनीकुमार सुप्रा या 50 वर्षांच्या आरोपीस संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच वाहतूक कंट्रोल रुमला मॅसेजद्वारे ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील मोबाईल जप्त केला असून त्यात त्याने धमकी मॅसेज पाठविल्याचे उघडकीस आले. आश्विनीकुमार हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून गेल्या पाच वर्षांपासून उत्तरप्रदेशच्या नोएडा शहरात नोकरी करत होता. त्याचा फिरोज नावाचा एक मित्र असून त्याच्यामुळे त्याला तीन महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी त्याने धमकीचा मॅसेज केल्याचे तपासात उघडकीस आले.
मात्र धमकीचा मॅसेज पाठविणे त्याच्याच अंगलट आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनीी सांगितले.