मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 सप्टेंबर 2025
मुंबई, – लालबाग, शिवडी आणि पवईतील तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीसह दोन तरुणांचा समावेश आहे. चंदा प्रभू वजनदार, विघ्नेशकुमार तुषार पोपलकर, देवांश भरत पटेल अशी या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी काळाचौकी, शिवडी आणि पवई पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन चालकांना अटक केली असून या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले. अपघातानंतर एक चालक पळून गेला असून त्याचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सुमन प्रभू वजणदार ही महिला मूळची कर्नाटकया बिंदरची रहिवाशी असून सध्या लालबाग परिसरात राहते. ती सफाई कर्मचारी म्हणून कामाला असून तिला शैलेश ऊर्फ शैलू आणि चंदा नावाचे दोन मुले आहेत. शुक्रवारी रात्री तीन ते चारच्या दरम्यान ती लालबाग येथील डॉ. बी. एस रोड, भायखळा येथून दादरच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर सफाईचे काम करत होती. यावेळी तिचे दोन्ही मुले लालबागचा गणपतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर झोपली होती. यावेळी तेथून भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने तिच्या दोन्ही मुलांना जोरात धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते.
जखमी झालेल्या शैलेश आणि चंदा यांना तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे दोन वर्षांच्या चंदाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर अकरा वर्षांच्या शैलेशवर उपचार सुरु होते. त्याच्या छातीला आणि पोटाला खरचटल्याच्या जखमा होत्या. अपघातानंतर वाहनचालक दोघांनाही कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळाहून पळून गेला होता. याप्रकरणी सुमन वजणदार हिच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका दोन वर्षांच्या मुलीच्या मृत्यूस तर अकरा वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरा अपघात गुरुवारी 4 सप्टेंबरला सकाळी सव्वासहा वाजता शिवडीतील वडाळा वाहतूक पोलीस चौकीजवळील बीपीटी रोड, ईस्टर्न फ्रीवे खालील उत्तर वाहिनीवर झाला. राज रविंद्र पितळे हा अंधेरीतील सहार रोड, संभाजीनगर परिसरात राहतो. त्याची स्वतची टुर्स अॅण्ड ट्रॅव्हेल्स कंपनी आहे. 21 वर्षांचा विघ्नेशकुमार हा याच परिसरात राहत असून गेल्या आठ वर्षांपासून त्यांची मैत्री आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेतीन वाजता ते दोघेही त्याच्या स्कूटीवरुन परिसरातील गणपती पाहण्यासाठी गेले होते. तेथून ते दोघही ताडदेवच्या कुंभारवाडा येथील गणपती दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते दोघेही स्कूटीवरुन त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते.
ही स्कूटी सकाळी सव्वासहा वाजता ईस्टर्न फ्रीवेखालील उत्तर वाहिनीवरुन जात असताना एका मिक्सर डंपरने त्यांच्या स्कूटीला जोरात धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे विघ्नेशकुमारला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर राज पितळेवर तिथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी अपघाताची नोंद करुन पोलिसांनी मिक्सर डंपरचा चालक करणकुमार भीमक पाल याला अटक केली. तो बिहारच्या धनाहा, बितियाच्य चंपारणचा रहिवाशी आहे.
तिसरा अपघात शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता पवईतील आयआयटी मेन गेटसमोरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळील जोगेश्वरीकडे ाजणार्या वाहिनीवर झाला. भरत वल्लभभाई पटेल हा जोगेश्वरीतील एमएमआरडीए कॉलनी, अंगारिका सोसायटीमध्ये राहत असून तो सध्या एअर इंडियामध्ये कामाला आहे. 22 वर्षांचा देवांश हा त्यांचा मुलगा असून तो गुरुवारी रात्री त्याचा मित्र स्वप्निल श्रवण विश्वकर्मासोबत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेतल्यानंतर ते घरी येण्यासाठी निघाले होते.
त्यांची स्कूटी आयआयटी मेन गेटसमोर आली असता एका बेस्ट बसने त्यांच्या स्कूटीला धडक लिी होती. ते दोघेही जखमी झाल्याने त्यांना पवई पोलिसांनी जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. देवांशच्या डोक्यावरुन बसचे चाक गेल्याने त्याचा उपचारादरम्यान सकाळी आठ वाजता मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भरत पटेल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बसचालक उत्तम जिजाबा कुमकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर आरोपी डंपरचालक करणकुमार पाल आणि बसचालक उत्तम कुमकर यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.