महिलेवर लैगिंक अत्याचार करुन खंडणी मागणार्या मित्राला अटक
शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 सप्टेंबर 2025
मुंबई, – नोकरीच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या एका विवाहीत महिलेशी मैत्री करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी मित्राला वाकोला पोलिसांनी अटक केली. अॅपलॉन जॉर्ज फर्नाडिस असे या 48 वर्षीय आरोपी मित्राचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने पिडीत महिलेचे शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची तसेच तसे न करण्यासाठी तिच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत महिला 32 वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या राजकोट शहरात राहते. दोन वर्षापासून ती नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच प्रयत्नात असताना तिची मार्च 2024 रोजी सांताक्रुज येथे राहणार्या अॅपलॉनशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने तिला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. नोकरीनिमित्त ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
अनेकदा ते सांताक्रुज येथील एका हॉटेलमध्ये भेटत होते. तिथेच त्यांच्यात दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध आले होते. या शारीरिक संबंधाचे त्याने तिचे काही अश्लील फोटो काढले होते. काही दिवसानंतर तो तिचे फोटो दाखवून तिच्याकडे सतत शारीरिक सुखाची मागणी करत होता. तिने नकार दिल्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करुन धमकी देत होता. तिचे अश्लील फोटो तिच्या पतीसह सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी देत होता. इतकेच नव्हे तर तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्याच्याकडून सुरु असलेल्या आर्थिक आणि शारीरिक शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
शुक्रवारी तिने घडलेला प्रकार वाकोला पोलिसांना सांगून अॅपलॉन फर्नाडिस याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देणे, ब्लॅकमेल करुन तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला रविवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.