कांदिवलीत प्रॉपटीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान राडा
हाणामारीत वयोवृद्धाची हत्या तर हत्येप्रकरणी तिघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 सप्टेंबर 2025
मुंबई, – प्रॉपटीया वादातून दोन कुटुंबात तुफान राडा झाल्याची घटना कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात उघडकीस आला आहे. यावेळी एका कुटुंबातील सदस्यांनी दुसर्या कुटुंबातील रामलखन यादव या वयोवृद्धाची त्यांच्या राहत्या घरात प्रवेश करुन बेदम मारहाण करुन हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. अवधेश चौहाण, संजय चौहाण आणि कमलेश चौहाण अशी या तिघांची नावे असून हत्येच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येसह दंगल घडविणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. याच गुन्ह्यांत इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात रामलखन यादव हे त्यांच्या कुटुंबियंसोबत राहतात. याच परिसरात चौहाण कुटुंबियदेखील राहतात. गेल्या काही दिवसांपासून यादव आणि चौहाण कुटुंबियांमध्ये प्रॉपटवरुन वाद सुरु होता. रामलखन यादव राहत असलेली खोली आपल्या मालकीचा असल्याचा दावा करुन चौहाण कुटुंबियांकडून त्यांच्यासोबत वाद सुरु होता. शुक्रवारी 5 सप्टेंबरला याच कारणावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये प्रचंड वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन चौहाण कुटुंबियांनी रामलखन यादव यांच्या घरात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी रामलखन यांना हाताने काठीने, बांबूने बेदम मारहाण केली होती. त्यात रामलखन हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
तिथे प्राथमिक औषधोपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. रामलखन यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या यादव कुटुंबियांनी कांदिवली पोलिसांना दोषीवर कारवाई करण्यासाठी जोरदार घोषणाजाी केली होती. जोपर्यंत कारवाई होत नाही तोवर रामलखन यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला होता.
घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांना दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांविरुद्ध हत्येसह दंगल घडविणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या संजय चौहाण, अवधेश चौहाण आणि कमलेश चौहाण या तिघांना अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुन्हा तिथे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.