हॉलीवूड अ‍ॅक्टर असल्याचे सांगून वयोवृद्ध महिलेची फसवणुक

लंडनस्थित मुलीच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – हॉलीवूड अ‍ॅक्टर असल्याचे सांगून एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्ध महिलेच्या लंडन येथे राहणार्‍या मुलीच्या ऑनलाईन तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. फसवणुकीची रक्कम डेहरादूर येथील एका बँक खात्यात जमा झाल्याने या गुन्ह्यांच्या तपासकामी वर्सोवा पोलिसांची एक टिम तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ऑनलाईन फसवणुकीसाठी पहिल्यांदाच एका हॉलीवूड अ‍ॅक्टरच्या नावाचा गैरफायदा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्नेहा नवीन भावनानी ही तिच्या पतीसोबत लंडन येथे राहत असून एका खाजगी कंपनीत पब्लिशिंगचे काम करते. तिची आई डाफनी रामचंद्र कामत (69) ही अंधेरीतील सातबंगला, नाना-नानी पार्क परिसरात राहते. डाफनी यांची प्रकृती ठिक नसल्याने तिचे मानसोपचार तंज्ञांकडे उपचार सुरु आहेत. तिला तिच्या बँकेचा व्यवहार मेलद्वारे पाठविला जातो. मात्र आजारी असल्याने ती मेल पाहत नाही. त्यामुळे स्नेहा भावनानी याच बँकेच्या सर्व व्यवहार पाहतात. 30 जूनला स्नेहा या लंडनमध्ये असताना तिला तिच्या आईच्या बॅक खात्यात 65 हजार रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. ही रक्कम अशा नाहर या व्यक्तीच्या डेहरादून येथील बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. त्यामुळे तिने तातडीने तिच्या आईला संबंधित व्यवहाराबाबत विचारणा केली होती.

तिने तिला एका कियानो चाल्स रिव्हज नावाच्या हॉलीवूड अ‍ॅक्टरशी संबंधित इंटाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉटअपद्वारे मॅसेज आला होता. त्याने तो हॉलीवूड अ‍ॅक्टर असल्याचे सांगून तिला भेटण्यासाठी भारतात येणार आहे. त्याला इंडियन करन्सीची गरज असल्याने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने एनईएफटी करुन त्याला ती रक्कम संबंधित बँक खात्यात पाठविल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती हॉलीवूड अ‍ॅक्टर असेल तर तो तिच्या आईकडे पैशांची का मागणी करेल असे सांगून तिने यापुढे कोणालाही पैसे पाठवू नकोस. तिची अज्ञात व्यक्तीने फसवणुक केल्याचे सांगून यापुढे कोणालाही ऑनलाईन पैसे पाठवू नकोस असे सांगितले.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने तिच्या वकिलामार्फत वर्सोवा पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. तिची आई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सक्षम नसल्याने तिची ऑनलाईन जबानी नोंदवून घेण्यात आली होती. या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या व्यक्तीची टेलिग्राम, व्हॉटअप आणि इंटाग्रामची माहिती घेण्यात आली असून त्याच्या बँक खात्याबाबत संबंधित बँकेला माहिती देण्यात आली आहे. वर्सोवा पोलिसांची एक टिम लवकरच डेहरादूर येथे तपासकामी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page