मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – पवईतील एका पॉश सोसायटीमधील बॅगेत सापडलेल्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी श्रीविलास नावाच्या एका तरुणाला पवई पोलिसांनी अटक केली असून त्याचा दुसरा सहकारी पळून गेला आहे. त्यांनी सोसायटीमध्ये टाकलेल्या बॅगेत पोलिसांना अफूची बोंडे, हायड्रोपोनिक गांजा आणि वजनकाटा असा सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्यात यश आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
2 सप्टेंबरला पवईतील मरोळ, कनाकिया रेन फॉरेस्ट या पॉश सोसायटीच्या बेसमेंटमध्ये एक बेवारस बॅग पडली असल्याची माहिती सोसायटीचे सदस्य संदीप बोडके यांनी दिली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, पोलीस हवालदार सुरनर, पोलीस शिपाई शिरसाट, वारंग यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 2 लाख 15 हजार रुपयांचे 43 ग्रॅम वजनाचे अफूची बोंडे, 4 लाख 96 हजार रुपयांचे 62 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, एक वजनकाटा व इतर साहित्य असा 7 लाख 12 हजार 500 मुद्देमाल जप्त केला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे. सोसायटीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजवरुन पोलिसांनी श्रीविलास नावाच्या एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्यानेच त्याच्या मित्राच्या मदतीने ड्रग्जची ती बॅग सोसायटीच्या ब्रेसमेंटमध्ये टाकून पलायन केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून त्याच्या मित्राची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.