कारवर आमदारचा लोगो लावून शासनाची फसवणुकीचा प्रकार उघड
राज्य चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी तोतयाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – खाजगी कारवर आमदार असल्याचा लोगो लावून शासनाच्या विविध सवलीसह टोल चुकविण्याचा वापर करुन शासनाची फसवणुकीचा प्रकार एका दक्ष नागरिकाच्या सतर्कमुळे उघडकीस आला आहे. या नागरिकाच्या तक्रारीच्या तक्रारीवरुन मानव व्यकंटेश मुन्नास्वामी या तोतया आमदाराविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी भारतीय न्याय कायदा आणि भारताचे राज चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मानवला चौकशीसाठी समन्स बजाविण्यात असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
59 वर्षांचे बाबूराव गंगाराम सुलम हे वडाळ्यातील अॅण्टॉप हि, पर्णकुटी सोसायटीमध्ये राहत असून ते बेस्ट कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते मुंबई तेलगू संघ या संस्थेचे अध्यक्ष आहे. ही संस्था सामाजिक कार्य करत असून त्यांच्या संस्थेची धर्मादाय आयुक्त येथे नोंद आहे. सायन-प्रतिक्षानगर परिसरात संस्थेचे एक कार्यालय आहे. संस्थेत एकूण नऊ सभासद आहेत. मानव मुन्नास्वामी हा 2020-23 या कालावधीत संस्थेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. सध्या त्याचा संस्थेशी काहीही संबंध नाही, तो कुठल्याही पदावर नाही.
मानव याच्या मालकीचे दोन कार आहेत. इनोव्हा क्रिस्टर आणि मारुती सुझुकी व्हॅगनार या दोन्ही कारचा तो स्वतच्या खाजगी कामासाठी वापर करतो. तो राज्य शासनाच्या कोणत्याही पदावर नाही. तसेच तो निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसून महाराष्ट्र विधान मंडळाच्या विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहाचा सभासद नाही. तरीही तो त्याच्या वाहनावर विधानसभा सदस्य असल्याचा लोगो लावतो. या लोगोच्या मध्यभागी भारत सरकारचे प्रतिक अशोकस्तंभ आहे.
इतकेच नव्हे तर तो त्याच्या वैयक्तिक वाहनांवर लोकसेवकाच्या शासकीय वाहनावर असतात त्या प्रकारची महाराष्ट्र शासन असे पांढर्या रंगाच्या पाटीवर लाल रंगामध्ये लिहिलेली पाटी लावतो. हा प्रकार संशयास्पद वाटताच बाबूराम सुलम यांनी त्यांच्या दोन्ही वाहनांचे फोटो त्यांच्या मोबाईलवर काढले होते. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही महाराष्ट्र विधान मंडळाचा सदस्य नसताना तो लोकांना आपण आमदार असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करतो. आमदार असल्याचे सांगून टोल चुकवणे, इतर शासकीय सवलतीचा लाभ घेतो शासनाची फसवणुक करत होता.
या प्रकारानंतर बाबूराव सुलम यांनी 7 सप्टेंबरला वडाळा टी टी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करुन मानव मुन्नास्वामी यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा केली होती. यावेळी बाबूराम सुलम यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले होते.
त्यांच्या तक्रारीवरुन मानव मुन्नास्वामी यांच्याविरुद्ध पोलिसांनी 3, 7 भारताचे राज्य चिन्हचा गैरवापर करणे आणि भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस बजाविण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून या चौकशीचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले.