मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ एप्रिल २०२४
मुंबई, – बल्गेरिया देशाच्या कार्गो जहाजाच्या अपहरणानंतर इरानियन जहाजाचे अपहरण करुन २३ पाकिस्तानी क्रु मेंबरला ओलीस ठेवल्याप्रकरणी नऊ सोमालियन चाच्यांना भारतीय नौदलाने ताब्यात घेतले. या सर्वांना पुढील चौकशीसाठी येलोगेट पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केलेल्या सर्व सोमालियन चाच्यांना गुरुवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान अपहरण केलेल्या जहाजातून सर्व पाकिस्तानी क्रु मेंबरची सुखरुप सुटका करण्यात आली असून चौकशीसाठी त्यांना सोडून देण्यात आले आहे. अटकेत असलेल्या चाच्यांमध्ये जेली जामा फराह, अहमद बशीर ओमार, अबदीकरीम मोहम्मद शिरे, आदन हसन वारमासे, मोहम्मद अबीदी अहमद, अबदीलकादीर मोहम्मद अली, आयुदीद मोहमूद जिमाले, सैद यासिन आदन आणि जमा सैद इलमी यांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यांत काही सोमालियन चाच्यांना बल्गेरिया देशाच्या एका कार्गो जहाजाचे अपहरण करुन जहातातील क्रु मेंबरला ओलीस ठेवले होते. त्यांच्याकडील घातक शस्त्रांनी जिवे मारण्याची धमकी देऊन स्वतच्या अर्थिक फायद्यासाठी जहाजाच्या मालकासह क्रु मेंबर्सच्या सुटकेसाठी ६० दशदक्ष अमेरिकन डॉलरची खंडणी स्वरुपाची मागणी केली होती. खंडणीची ही रक्कम दिली नाहीतर सर्वांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी भारतीय नौसेनेने ऍण्टी पायरेसी ऑपरेशन हाती घेऊन जहाजावरील सर्व सभासदांची सुटका केली होती. याच प्रकरणात ३५ हून अधिक सोमालियन चाच्यांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना नंतर येलोगेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच अशाच प्रकारे दुसरी घटना २९ मार्चला घडली. इरानियन देशाच्या एका मासेमारी बोटीचे काही सोमालियन चाच्यांनी अपहरण केले होते. या जहाजावर २३ हून अधिक पाकिस्तान क्रु मेंबर होते. ही माहिती प्राप्त होताच भारतीय नौसेनेने पुन्हा ऍण्ी पायरेसी ऑपरेशन हाती घेतले होते. अपहरण केलेल्या जहाजाचे चारही बाजूंनी नाकाबंदी करुन भारतीय नौदलाने अपहरणकर्त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आव्हान केले होते. मात्र वारंवार आव्हान करुन त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पळून जाण्याचा मार्ग नसल्याने त्यांनी नंतर आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील शस्त्रे समुद्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय नौदलाने नऊ सोमालियन चाच्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना पुढील चौकशीसाठी येलोगेट पोलिसाकडे सोपविले होते. या चाच्यांकडून ७२८ जिवंत काडतुसे, एके ४७ रायफल, एक जीपीएस डिव्हाईस, आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत नौसेनेने २३ पाकिस्तानी क्रु मेंबरची सुटका केली आहे. चौकशीनंतर या सर्वांना सोडून देण्यात आले. या नऊ सोमालियन चाच्यांविरुद्ध येलोगेट पोलिसांनी ३६४ अ, ३६३, ३५३, ३४२, ३४४ अ, १२० ब, १४३, १४५, १४७, १४८, १४९, ५०६, ३४ भादवी सहकलम मेरिटाईम ऍण्टी पायरेसी ऍक्ट २०२२ सहकलम ३, ५ भारतीय हत्यार कायदा सहकलम ३, २५ २७ पासपोर्ट अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर सर्वांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी त्यांच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.