मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ एप्रिल २०२४
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस रिक्षा चोरी करणार्या एका रिक्षाचालकास एमएचबी पोलिसांनी अटक केली. शशिकांत मल्लेश कामनोर असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने रिक्षा चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या चारही रिक्षा हस्तगत केल्या आहेत. मौजमजेसाठी शशिकांत हा रिक्षा चोरी करत असल्याचे उघडकीस आले असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
बोरिवलीतील न्यू लिंक रोड, गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक सातमध्ये आदित्य भीम मिश्रा हा २२ वर्षांचा तक्रारदार तरुण राहत असून तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. १६ मार्चला त्याने त्याची रिक्षा आयसी कॉलनी, मजिसा इलेक्ट्रॉनिक ऍण्ड हार्डवेअर स्टोरजवळ पार्क केली होती. १६ मार्चला त्याची रिक्षा रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्याने एमएचबी पोलिसात तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांत बोरिवली हद्दीत रिक्षा चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत एमएचबी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे, पोलीस हवालदार प्रविण जोपळे, संदीप परीट, सतीश देवकर, अर्जुन आहेर, गणेश शेरमाळे यांनी तपास सुरु केला होता. घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती ही चोरी करुन पळून जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शशिकांत कामनोर याला पोलिसांनी अटक केली. त्याला रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांत यापूर्वी ठाण्याच्या नवघर पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याने एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली होती. शशिकांत हा रिक्षाचालक असून सध्या बेरोजगार आहे. बोरिवलीतील न्यू लिंक रोडवर फुटपाथवर राहणारा शशिकांत हा दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षाची चोरी करत होता. त्यापैकी तीन रिक्षा त्याने बोरिवली परिसरात लपवून ठेवल्या होत्या. या तिन्ही रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. एक रिक्षा नवघर पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती रिक्षा लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच अन्य गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.