मिस कॉलवरुन एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला

कांदिवलीतील घटना; पती-पत्नीसह दोन्ही मित्रांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 सप्टेंबर 2025
मुंबई, – पत्नीला केलेल्या मिस कॉलवरुन झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर त्यांच्याच कुटुंबातील चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात विनोद गांडा वाघारी, त्यांचा भाऊ विजय गांडा वाघारी व त्याची पत्नी रेखा विजय वाघारी यांना दुखापत झाली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच चौघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या दोन मित्रांचा समावेश आहे. रवी सुरेश खारवी, पूजा रवी खारवी, मानव नरेश दंतानी आणि आकाश नरेश दंतानी अशी या चौघांची नावे आहेत. जखमी आणि आरोपी नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना 31 ऑगस्टला सायंकाळी चार वाजता कांदिवलीतील सागवाडी, वंझारा चाळ, पटेलनगरात घडली होती. विनोद गांडा वाघारी हे कांदिवलीतील सागवाडी, पटेलनगर परिसरात राहत असून त्यांचा विजय गांडा वाघारी हा लहान भाऊ आहे. ते दोघेही शेजारीच राहत असून त्यांचा खेळणी विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी रवी हा त्यांचा पुतण्या तर इतर दोन आरोपी त्याचे मित्र आहेत. रवि हा त्याची पत्नी पूजासोबत याच परिसरात राहतो. काही वर्षांपूर्वी विजयचे रवीच्या पत्नीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. हा प्रकार रविला समजताच दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड वाद झाला होता. सतत होणार्‍या भांडणानंतर दोन्ही कुटुंबियांनी मध्यस्थी करुन विजय आणि पूजा यांना योग्य ती समज दिली होती. 30 ऑगस्टला विजयच्या मोबाईलवरुन पूजाला एक मिस कॉल गेला होता.

हा प्रकार समजताच रविने विजयला जाब विचारला होता. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र स्थानिक रहिवाशांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता.रविवारी 31 ऑगस्टला सायंकाळी चार वाजता विनोद हे त्यांची पत्नी मीना, मुले रोहित, राज, मुलगी मधु, विजय व त्याची पत्नी रेखा यांच्यासोबत अंधेरी येथे गणपती विसर्जनाच्या ठिकाणी जात होते. सागवाडी येथून जाताना तिथे रवी, त्याची पत्नी पूजा आणि दोन मित्र मानव दंतानी आणि आकाश दंतानी हे चौघेही आले होते. मिस कॉलवरुन त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती.

काही कळण्यापूर्वी या चौघांनी विजयला शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी इतर तिघांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनाही या चौघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत विनोद, त्यांचा भाऊ विजय, त्याची पत्नी रेखा असे तिघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्राथमिक औषधोपचारानंतर या तिघांनाही नंतर सोडून देण्यात आले.

ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी रवी खारवी, पूजा खारवी, मानव आणि आकाश दंतानी या चौघांविरुद्ध गंभीर दुखापतीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत या चौघांना पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले होते. त्यांचा शोध सुरु असताना दोन दिवसांपूर्वी रवी खारवी, पूजा खारवी, मानव आणि आकाश दंतानी या चौघांना पोलिसांनी कांदिवली येथून अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page