बॉम्बच्या मेलमुळे मुंबई उच्च न्यायालयात तणावाचे वातावरण
संपूर्ण इमारतीची तपासणी केल्यांनतर बॉम्बची अफवा निघाली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 सप्टेंबर 2025
मुंबई, – मुंबईतील समुद्रात बॉम्बस्फोटाची धमकीची घटना ताजी असताना बॉम्बच्या मेलमुळे शुक्रवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात प्रचंड तणावाचे निर्माण झाले होते. न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी करुन कसून तपासणी करण्यात आली, मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. या बॉम्बच्या मेलने न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते, अखेर दुपारनंतर न्यायालयीन काम सुरु करण्यात आले. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, सायबर सेल आणि एटीएसला तपासाचे आदेश दिले होते. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खोटी बॉम्बची माहिती देऊन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील महापे कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन समुद्रकिनार्यावर बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर मुंबईतील समुद्रकिनार्यावरील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर दिल्लीतील उच्च न्यायालयात अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठविला होता. मेलनंतर काही तासांत मुंबई उच्च न्यायालयातही अशाच प्रकारे अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठविला होता. हा मेल न्यायालयीन कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती.
कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून न्यायालयाची संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. त्यानंतर श्वान पथकासह बॉम्बशोधक व नाशक पथकाने इमारतीचा ताबा घेऊन तिथे तपासणी सुरु केली होती. जवळपास दोन ते तीन तास संपूर्ण इमारतीची तपासणी केल्यानंतर तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे न्यायमूर्तीसह न्यायालयीन कर्मचारी, वकिलासह इतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
या धमकीमुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. दुपारनंतर अखेर न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात केली होती. यावेळी न्यायालयात येणार्या प्रत्येकाची नेहमीपेक्षा अधिक तपासणी केली जात होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मेल पाठविणार्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेसह एटीएस आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.