सोनसाखळी चोरीच्या मोस्ट वॉण्टेड आरोपी गजनी गजाआड
आरोपीविरुद्ध मुंबईसह ठाण्यात तेराहून अधिक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 सप्टेंबर 2025
मुुंबई, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील एका मोस्ट वॉण्टेड आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. हुसैनी मुख्यार इराणी ऊर्फ गजनी असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे तेराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. सोनसाखळी चोरी करणारी ही इराणी टोळी असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
देवीदास प्रभाकर रांगणेकर हे 77 वर्षांचे वयोवृद्ध साताक्रुज येथे राहत असून ते स्टेट बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झाले आहेत. 23 ऑगस्टला ते सकाळी साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले होते. साताक्रुज येथील एस. व्ही रोड, नोबेल मेडीकलसमोरुन जात असतानाअचानक बाईकवरुन दोन तरुण आले. त्यांनी त्यांच्याकडे जवळच कुठे गणेश मंदिर आहे का याबाबत विचारणा केली. त्यामुळे त्यांनी त्यांनी त्यांना विलेपार्ले येथे गणेश मंदिर असल्याचे सांगितले. काही वेळानंतर ते नास्ता घेण्यासाठी पुढे गेले होते. बेझंट रोड, रंगरुप शॉपसमोर आल्यानंतर ते दोघेही पुन्हा तिथे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे कुठला गणेश मंदिर जवळ आहे असे बोलून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पलायन केले होते. त्यांनी या दोघांचा पाठलाग केला,
मात्र ते दोघेही सुसाट वेगाने तेथून पळून गेले. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता. परिसरातील सुमारे साडेतीनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात एका आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना आले.हा आरोपी आंबिवली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कलाटकर, तुषार सावंत, पोलीस हवालदार नितिन केणी, अभिषेक कर्ले, पोलीस शिपाई नरेंद्र हिरेमठ, मारुती गावडे, मनोज पाटील, श्रीनिवास चिला, राहुल चतुर, तेजस माने, आनंदा दिवाणजी आणि प्रसाद जाधव यांनी आंबिवली परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी इराणी वस्ती, पाटीलनगर परिसरात आलेल्या हुसैनी इराणी ऊर्फ गजनी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याच्या सहकार्याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
गजनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सोनसाखळी चोरीचे मुंबईसह ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात तेराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन, वर्तकनगर, महात्मा फुले नगर पोलीस ठाण्यात दोन, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कोळसेवाडी, सांताक्रुज आणि मानपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्यांचा समावेश आहे. सोनसाखळी चोरी करणारी ही एक इराणी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत त्याच्या एका सहकार्याचा सहभाग उघडकीस आला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कलाटकर आणि तुषार सावंत हे करत आहेत.