खाजगी कंपनीच्या 34 लाखांचा अपहार करुन फसवणुक
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोन कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 सप्टेंबर 2025
मुंबई, – कुर्ला येथील क्युडीजी सर्व्हिसेस लिमिटेड या खाजगी कंपनीच्या सुमारे 34 लाखांचा कंपनीच्याच दोन कर्मचार्यांनी अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीत आर्थिक घोटाळा करणार्या दोघांविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन बळीराम सोनावणे आणि निशा नितीन जाधव अशी या दोघांची नावे आहेत. यातील सचिन सोनावणे हा स्टोअर मॅनेजर तर निशा जाधव ही त्याची मदतनीस म्हणून कामाला होती. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितीन सुभाष वाघ हे ठाण्यातील पाटलीपाडा परिसरात राहतात. सध्या ते क्युडीजी सर्व्हिसेस लिमिटेड या खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. या कंपनीचे मुख्य कार्यालय दादर येथील आंबेडकर भवनसमोरील निळकंठ अपार्टमेंटमध्ये आहे. पूर्वी कंपनीचे सर्व कामकाज कुर्ला येथील कार्यालयातून चालत होते. त्यांची कंपनी वॉश आणि सिमेंन्स या कंपनीच्या वॉशिंग मशिन, डिश वॉशर, ड्रायर रेफ्रिजरेटर आदी उत्पादक आणि विक्रेत्या कंपनीची वेंडर आहे. कंपनीच्या प्रोडेक्टच्या विक्रीनंतर कंपनीच्या वतीने त्यांची कंपनी सेवा देण्याचे काम करते. ग्राहकांना प्रोडक्ट इन्स्टॉल करुन देणे, प्रोडक्टमध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्त करुन देणे आदी काम करते. संपूर्ण भारतात त्यांची सर्व्हिस चालते.
गेल्या काही वर्षांत कंपनीने अनेक ग्राहकांकडे कामासाठी त्यांचे कर्मचारी पाठविले होते. काही ग्राहक पेमेंट ऑनलाईन देतात तर कॅश स्वरुपात पेमेंट मिळाल्यास ती कॅश स्टोअर कम मॅनेजरकडे जमा केली जाते. त्यानंतर ही रक्कम बँकेत जमा केली जात होती. याच कंपनीत सचिन सोनावणे हा स्टोअर मॅनेजर म्हणून जून 2024 पासून रुजू झाला होता. त्याच्यावर कंपनीकडून आलेले पार्ट स्टोअरमध्ये नोंद करणे, टेक्निशियन वर्कऑर्डर आल्यास त्यांना ते पार्ट देऊन त्याची नोंद करणे, पार्टच्या आलेल्या पैशांचा हिशोब ठेवणे, त्याचा संपूर्ण डेटा कंपनीच्या वरिष्ठांना देणे आदी कामाची जबाबदारी होती.
नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीचे ऑडिट झाले होते. त्यात कंपनीत आलेले आणि कंपनीकडून टेक्निशियनला दिलेल्या पार्टमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नितीन वाघ यांनी सचिन सोनावणेकडे त्याचा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्याचा रिपोर्ट सादर केला नाही. रिपोर्टबाबत तो टोलवाटोलवा करुन विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कामात निशा जाधव ही मदतनीस म्हणून काम करत होती. तिच्यावर डेटा इंट्रीची जबाबदारी होती, मात्र डिसेंबर 2024 पर्यंत या दोघांनी त्यांचा रिपोर्ट सादर केला नव्हता.
जून ते डिसेंबर 2024 या कालावधीच्या सर्व बुकची तपासणी केली होती. त्यात कंपनीला जीएसटीसह 95 लाख 29 हजार 631 रुपयांचे स्पेअर पार्ट पुरविण्यात आले होते. टेक्निशियनकडे 2 लाख 35 हजार 275 रुपयांचे तर स्टोअरमध्ये 23 लाख 31 लाख 340 असे 25 लाख 66 हजार 654 रुपयांचे स्पेअर पार्ट होते. 35 लाखांच्या स्पेअर पार्टचा हिशोब मिळून आला नाही. ऑफ ड्यूटी वॉरंटी चार्जेसचे 19 लाख 35 हजारापैकी 14 लाख 10 हजार 800 रुपये जमा झाले होते. उर्वरित सव्वापाच लाखांचा हिशोब मिळत नव्हता.
तपाासादरम्यान सचिन सोनावणे आणि निशा जाधव यांनी संगनमत करुन कंपनीच्या सुमारे 34 लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केलीद होती. हा प्रकार उघडकीस येताच 12 डिसेंबरपासून निशा तर 3 जानेवारीपासून सचिन हा कामावर आले नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी कोणतेही कारण कंपनीला सांगितले नाही. त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे या दोघांनीच हा संपूर्ण आर्थिक घोटाळा करुन कंपनीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.
हा रिपोर्ट नितीन वाघ यांच्याकडून वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या सांगण्यावरुन त्यांनी कंपनीच्या वतीने नेहरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन सोनावणे आणि निशा जाधव या दोघांविरुद्ध पोलिसांनी कंपनीच्या 34 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.