चालताना धक्का लागला म्हणून तिक्ष्ण हत्याराने भोसकले
आरोपींमध्ये चौदा ते सोळा वयोगटातील मुलांचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 सप्टेंबर 2025
मुंबई, – चालताना धक्का लागला म्हणून विनोद विसुदेव राय या 45 वर्षांच्या व्यक्तीवर चारजणांच्या टोळीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना मानखुर्द पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात चौदा ते सोळा वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांचा समावेश समावेश आहे. त्यांचा सहकारी अरबाज बाबुल शेख याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतक्या क्षुल्लक कारणावरुन आरोपींनी विनोदला तिक्ष्ण हत्याराने भोसकल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड, इमारत क्रमांक तीन, आदर्श सोसायटीच्या समोरील रस्त्यावर घडली. याच परिसरातील इमारत क्रमांक आठमध्ये सुनैना ऋतिक घोलप ही 22 वर्षांची तरुणी राहते. विनोद राय हे तिचे वडिल असून ते तिच्यासोबत राहतात. गुरुवारी रात्री अकरा वाजता विनोद राय हे आदर्श सोसायटीसमोरुन पायी चालत जात होते. चालताना त्यांचा तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांना धक्का लागला होता.
याच कारणावरुन त्यांच्याशी या तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली होती. काही कळण्यापूर्वीच त्यातील चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केी. त्यांच्यावर तिक्ष्ण वार करुन प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या पोटाला, छातीला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते चौघेही पळून गेले. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या विनोद राय यांना तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
ही माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुनैना घोलप हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अरबाजसह इतर तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चारही आरोपी मानखुर्दचे रहिवाशी असून अल्पवयीन मुले चौदा ते सोळा वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर अरबाजला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. चालताना धक्का लागला म्हणून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.