एसआरएच्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी
दोन दिवसांत पैसे दिले नाहीतर गेम करण्याची धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 सप्टेंबर 2025
मुंबई, – मानखुर्द येथील एसआरए प्रोजेक्ट सुरु असलेल्या मॅनेजरकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या मालकाचा गेम करण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजरच्या तक्रारीवरुन नितीन भानुदास आवारे ऊर्फ चिव्या या सराईत गुन्हेगाराविरुद्ध देवनार पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुनिल रामचंद्र सिंग हे विक्रोळीतील रहिवाशी असून भैरव इरेक्टर लिमिटेड या कंन्स्ट्रक्शन कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा विकास सिंग याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याची रियांश ट्रान्सपोर्ट नावाची एक खाजगी कंपनी आहे. त्यांच्या भैरव इरेक्टर लिमिटेड कंपनीच्या माध्यामातून मानखुर्द येथील विर लहूजी, अण्णाभाऊ साठेनगर येथील एसआरए प्रोजेक्टचे काम सुरु आहे. 9 सप्टेंबरला ते ज्ञानदेव नानाभाऊ साठे यांच्या अत्यविधीसाठी गेले होते. अत्यविधीनंतर ते त्यांच्या घरी जात होते. त्यांची कार घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरुन शिवाजीनगर, उदंचन केंद्राजवळ आली असता एका बाईकस्वाराने त्यांच्या कारला ओव्हरटेक केले होते.
या व्यक्तीने त्याच्याकडील घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या व्यकतीने स्वतचे नाव नितीन आवारे असल्याचे सांगून तुझे साहेब विवेक जैन यांना सांग की मानखुर्द येथे एसआरए प्रोजेक्टचे काम पूर्ण करायचे असेल तर दोन दिवसांत 25 लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम दिली नाही त्यांच्यासह त्यांचे मालक विवेक जैन यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. भरस्त्यात हा प्रकार घडल्याने तिथे काही रिक्षाचालक आणि स्थानिक रहिवाशी जमा झाले होते. या सर्वांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तो त्याच्या बाईकवरुन तेथून पळून गेला होता.
या घटनेनंतर त्यांनी वीर लहूजी अण्णाभाऊ साठे नगरातील काही रहिवाशांकडे नितीन आवारे याच्याविषयी चौकशी केली होती. यावेळी त्यांना नितीन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. साठेनगर परिसरात त्यांची प्रचंड दहशत आहे. या माहितीनंतर त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले होते. घडलेला प्रकार त्यांनी त्यांचे मालक विवेक जैन यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी नितीन आवारे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे शनिवारी त्यांनी देवनार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून नितिन आवारे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत नितीनविरुद्ध 25 लाखांच्या खंडणीसाठी घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत देवनार पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे.