मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 सप्टेंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथील ड्रंक अॅण्ड ड्राईव्हप्रकरणी तिघांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये महिला चालकासह तिच्या दोन मित्रांचा समावेश आहे. भाविका हिरेन धामा, कोरम महेश भानुशाली आणि अनिकेत बनसोडे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नाच्या कलमांतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भाविका ही घाटकोपरच्या भानुशालीवाडीत राहत असून ती गरबा क्लासेस चालवते. तिचे गरबा क्लासेस घाटकोपर, मुलुंड आणि वाशी येथे चालते. शुक्रवारी रात्री उशिरा ती तिची मैत्रिण कोरम भानुशाली आणि मित्र अनिकेत बनसोडे यांच्यासोबत पार्टीसाठी भेटली होती. या तिघांनी मद्यप्राशन केले होते. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता ते घाटकोपर येथून कुर्ल्याच्या दिशेने जात होते. यावेळी भाविका ही कार चालवत होती. ही कार घाटकोपरच्या लालबहादूर शास्त्री मार्ग, उपजलअभियंता कार्यालयासमोरुन जात असताना अचानक भाविकाचा कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने कार दुभाजकावरुन दुकानाच्या पायर्यावर आदळली. तिथे एक व्यक्ती झोपला होता.
कारच्या धडकेने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. अपघाताची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कारमध्ये पोलिसांना दारुच्या बाटल्या सापडल्या. घटनास्थळी असलेल्या भाविका आणि कोरम या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अनिकेत अपघातानंतर पळून गेला होता. त्याला काही वेळानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांची मेडीकल करण्यात आली असून त्यात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते.
मद्यप्राशन करुन कार चालवून एका व्यक्तीला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी भाविकासह इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मद्यप्राशन करुन कार चालविणे भाविकासह कोरम आणि अनिकेतला चांगलेच महागात पडले आहे.