ड्रग्जच्या गुन्ह्यांतील मोस्ट वॉण्टेड आरोपी महिलेस अटक
मोक्का कायद्यांतर्गत कारवाई; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 सप्टेंबर 2025
मुंबई, – शहरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी काही तरुणांना हाताशी धरुन संघटित टोळी बनवून ड्रग्ज विक्रीच्या कटातील एका मोस्ट वॉण्टेड आरोपी महिलेस वांद्रे युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. कायनात जब्बार शेख ऊर्फ कायनात कुरेशी असे या महिलेचे नाव असून तिच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला मोक्का कोर्टाने सोमवार 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एनडीपीएसची मोक्का कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांकडून झालेली ही महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई आहे.
ऑगस्ट महिन्यांत वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी एमडी ड्रग्जप्रकरणी अदनान आमीर शेख या मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली होती. या तिघांकडून पोलिसांनी 766 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. तपासात अदनान आणि कायनात कुरेशी यांनी स्वतची टोळी बनवून या टोळीच्या माध्यमातून मुंबई शहरात एमडी ड्रग्जची विक्री सुरु केली होती. ड्रग्ज विक्रीसाठी काही तरुणांना जादा पैशांचे आमिष दाखवून या टोळीत सामावून घेण्यात आले होते. संघटित टोळी बनवून ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश होताच
या आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यातच राज्य शासनाने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सुधारीत विधेयक मंजुर केले होते. त्यामुळे या पथकाने या तिघांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई सुरु केली होती. 19 ऑगस्टला तिन्ही आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली होती. ड्रग्ज तस्करी करणार्या टोळीविरुद्ध मोक्काच्या सुधारीत कायद्यांतर्गत कारवाई होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई होती.
या गुन्ह्यांत कायनात हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना ती दहिसर येथे तिच्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर कायनातला दहिसर येथून पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत अटक केली. अटकेनंतर तिला मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.