मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ एप्रिल २०२४
मुंबई, – सांताक्रुज येथील एका एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशिन फोडून आतील कॅश चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी जावेद यासीन शेख या २१ वर्षांच्या आरोपी तरुणाला वाकोला पोलिसांनी अटक केली. जावेदने यूट्यूबवर काही व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो पळून गेला होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
नवीन विठ्ठल कारकल हे बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहत असून एका बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. त्यांच्या बँकेचे एक एटीएम सेंटर साताक्रुज येथील वाकोला पाईपलाईन रोडवर आहे. सोमवारी १ एप्रिलला जावेद हा तिथे आला होता. त्याने एटीएम मशिनचे डोर एका कटरच्या सहाय्याने फोडून आतील कॅश चोरीचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न करुनही त्याला यश आले नाही. त्यामुळे तो तेथून पळून गेला होता. हा प्रकार नंतर बँकेच्या अधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त जॉर्ज फर्नाडिस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल केंगार, पालांडे, पोलीस हवालदार मसने, इंगळे, पोलीस शिपाई वाघमारे, पोटे, यादव, लोणे, मिस्त्री यांनी तपास सुरु केला होता. एटीएम सेंटरसह परिसरातील ७० ते ८० सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा शोध सुरु असतानाच या गुन्ह्यांतील आरोपी सांताक्रुज येथील धोबीघाट परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या पथकाने धोबीघाट येथून जावेद शेखला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच एटीएम मशिन फोडून आतील कॅश चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी एक बॅग जप्त केली असून त्यात ग्राइंडर ब्लेड्स मशिन, दोन ब्लेड, कटर, डोळ्यांचा चष्मा, मेकॅनिकल हातमोजे, मंकी कॅप, गॅस कटरसाठी लागणारे २०० प्लस ३० ग्रॅम गॅस कॅन, पाईपचा समावेश होता. या गुन्ह्यांत त्याने एका बाईकचा वापर केला होता, ती बाईक नंतर पोलिसांनी हस्तगत केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.