3.58 कोटीच्या एमडी ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक

आरोपींकडून 1 किलो 732 ग्रॅम एमडीचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 सप्टेंबर 2025
मुंबई, – ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तीन ड्रग्ज तस्करांना गुन्हे शाखेच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी 1 किलो 732 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 3 कोटी 58 लाख रुपये इतकी आहे. तिन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या वर्षांत एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी होत असल्याने ड्रग्ज तस्करांनी आपला मोर्चा एमडी ड्रग्जकडे वळविला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात एमडीची तस्करी वाढली होती. अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलीस दलाला दिले होते. या मोहीमेतंर्गत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, अ‍ॅण्टी नारकोटीक्स कंट्रोल सेलच्या अधिकार्‍यांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली होती.

ही मोहीम सुरु असताना बोरिवलीतील नॅशनल पार्कजवळ काहीजण एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी 3 सप्टेंबरला या पथकाने नॅशनल पार्कजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 1 किलो 297 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत 2 कोटी 59 लाख 40 हजार रुपये इतकी होती. हा साठा जप्त केल्यांनतर त्याच्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती.

ही कारवाई ताजी असताना 13 सप्टेंबरला मालाडच्या साईनाथ रोड, म्युनिसिपल मार्केटजवळ आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांनी अन्य एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 36 लाख 80 हजाराचा 184 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा जप्त केला होता. या एमडी ड्रग्जची विक्रीसाठी तो मालाड परिसरात आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली होती. तिसरी कारवाई वरळी युनिटने केली. सायन येथील बीएसटी बसस्टॉप, राणी लक्ष्मी चौकाजवळ वरळी युनिटचे काही अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी तिथे संशयास्पद फिरणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे या अधिकार्‍यांना 251 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा सापडला. त्याची किंमत 62 लाख 75 हजार रुपये इतकी होती.

अशा प्रकारे 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत तीन वेगवेगळ्या कारवाई वरळी, कांदिवली आणि आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांनी तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांकडून 3 कोटी 58 लाख रुपयांचा 1 किलो 732 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या तिन्ही घटनेनंतर तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी एका आरोपीला न्यायालयीन तर दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे आणि वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page