चोरीच्या उद्देशाने माऊंट मेरी जत्रेत आलेल्या बाराजणांना अटक

आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांसह तीन महिलांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 सप्टेंबर 2025
मुंबई, – वांद्रे येथे रविवारी सुरु झालेल्या माऊंट मेरी जत्रेत चोरीच्या उद्देशाने आलेल्या बाराजणांच्या एका टोळीला पहिल्याच दिवशी वांद्रे पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये नऊ पुरुषांसह पुण्यातील तीन महिलांचा समावेश आहे. इतर एका गुन्ह्यांत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दोन्ही अल्पवयीन मुले अमरावतीचे रहिवाशी आहेत. पहिल्याच दिवशी मोबाईल चोरीसह पाकिटमारीच्या एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांनी सांगितले.

माऊंट मेरी हे वांद्रे परिसरातील समुद्रकिनारी वसलेले एक प्रसिद्ध चर्च आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या रविवारी मदर मेरीचा उत्सव म्हणजेच माऊंट मेरी जत्रेचे आयोजन केले जाते. 14 सप्टेंबरला सुरु झालेली ही जत्रा येत्या रविवार 21 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या जत्रेत मुंबईसह महाराष्ट्र, देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन काही सराईत गुन्हेगार मुंबईसह इतर शहरातून भाविकांचे मोबाईल चोरीसह पाकिटमारीसाठी येतात. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच आरोपींच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झोनमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात निवडक अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे एक विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

या पथकाला माऊंट मेरी जत्रेत साध्या वेशात पाळत ठेवून मोबाईल चोरीसह पाकिटमारी करणार्‍या गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. रविवारी माऊंट मेरी जत्रेचा पहिल्याच दिवशी सुमारे पन्नास हजाराहून भाविक तिथे उपस्थित होते. यावेळी तिथे उसळलेल्या गर्दीचा फायदा घेऊन काही भाविकांचे मोबाईल चोरीसह पाकिट चोरीचे गुन्हे घडले होते. याप्रकरणी संबंधितांकडून वांद्रे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीसह पाकिटमारीची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन वेगवेगळ्या कारवाईत एकूण बारा आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोन्ही अल्पवयीन मुले अमरावतीचे रहिवाशी असून ते माऊंट मेरी जत्रेत चोरीच्या उद्देशाने आले होते. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

याच गुन्ह्यांत तीन महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्या तिघीही मूळच्या पुण्याच्या रहिवाशी आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या वेळेस या महिलांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांनी काही भाविक महिलांचे सोनसाखळी चोरीचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. इतर गुन्ह्यांत नऊ पुरुष आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात शकलेन संगीर अन्सारी, आसिफ युसूफ खान, इरफान भूटा मोहम्मद रजा आणि आसिफ अली शेख यांचासमावेश आहे. ते सर्वजण धारावी, घाटकोप, गोवंडी आणि मालवणीतील रहिवाशी आहे.

इतर आरोपी मुंबईसह ठाण्यात राहत असून ते सर्वजण गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीसाठी आल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्याच दिवशी वांद्रे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीसह पाकिटमारीच्या नऊ गुन्ह्यांची नोंद करुन पोलिसांनी तीन महिलांसह नऊ पुरुष आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई रविवारपर्यंत अशीच सुरु राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page