मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

आरोपी पतीसह मैत्रिणीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 सप्टेंबर 2025
मुंबई, – अनैतिक संबंधासह पैशांवरुन होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून शमीम ख्वाजा मंसुर शेख या 43 वर्षांच्या विवाहीत महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह मैत्रिणीला मालवणी पोलिसांनी अटक केली. ख्वाजा मंसुर शेख आणि शमीम अब्दुल रजा शेख अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. मृत शमीमची सासू हनीफा मंसुर शेख आणि दिर जलील मंसुर शेख या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आमीर रशीद खान हा मुंब्रा येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांची शमीम ही मोठी बहिण असून तिचे ख्वाजासोबत जानेवारी 2003 साली विवाह झाला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत मालाडच्या मढ, शिवाजीनगर, गेट क्रमांक दोनमध्ये राहत होती. या दोघांना वीस आणि पंधरा वर्षांची दोन मुले आहेत. लग्नाच्या वेळेस त्याच्या आईने शमीमसह ख्वाजाला काही सोन्याचे दागिने, घरगुती सामान आणि एक लाख रुपये कॅश हुंडा म्हणून दिला होता. लग्नाच्या काही महिन्यांत ख्वाजाची नोकरी गेली होती. घरी असताना तो तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. याबाबत शमीम तिच्या पालकांना ही माहिती सांगत होती. मात्र परिस्थिती बदलेल असे सांगून ते तिची समजूत काढत होते. ख्वाजा शमीमला माहेरहून पैसे आणावेत म्हणून मारहाण करत होता.

पहिली मुलगी झाली म्हणून त्याच्यासह त्याची सासू हनीफा, दिर जलील तिला सतत टोमणे आणि शिवीगाळ करत होते. शमीमच्या सांगण्यावरुन त्यांनी ख्वाजाला अनेकदा आर्थिक मदत केली आहे. तरीही तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरुच होता. दिड वर्षांपूर्वी ख्वाजाने मालाड येथे एक दुकान घेण्यासाठी तिच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती, तिने नकार दिल्यानंतर या तिघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीची माहिती समजताच शमीमच्या पालकांनी ख्वाजाला दोन लाख रुपये दिले होते. अलीकडेच तिला ख्वाजाचे एका महिलेशी अनैतिक संबंधाची माहिती समजली होती. तिने ख्वाजाला शमीम नावाच्या एका महिलेसोबत रंगेहाथ पकडले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. त्यातून तो तिला मारहाण करत होता.

याबाबत शमीमच्या पालकांनी ख्वाजासह त्याच्या आईसह भावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्याच मुलीमध्ये काहीतरी कमी आहे म्हणून ख्वाजा हा बाहेरील महिलेशी संबंध ठेवतो असे उलट उत्तर दिले होते. या संपूर्ण प्रकाराला शमीम ही कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून 26 ऑगस्ट 2025 रोजी शमीमने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. या घटनेनंतर आमीर खान यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

या जबानीतून त्याने घडलेला प्रकार सांगून तिच्या बहिणीच्या आत्महत्येला तिचा पती ख्वाजा, त्याची मैत्रिण शमीम शेख, सासू हनीफा आणि दिर जलील हेच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या चौघांविरुद्ध पोलिसांनी शमीमचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ख्वाजा शेख आणि शमीम शेख या दोघांना पोलिसांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत हनीफा आणि जलील यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page