बारबालेच्या प्रेमसंबंधातून दोघांवर पाचजणांकडून हल्ला
अंधेरीतील घटना; दोघांना अटक तर तिघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 सप्टेंबर 2025
मुंबई, – बारबालेच्या जुन्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून दोघांवर पाचजणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रामचंद्र आणि त्याचा मित्र मित्र निलेश असे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी पाच आरोपीविरुद्ध अंधेरी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली. यश अंबर चलावणे आणि शिवकुमार समरबहादूर सिंग ऊर्फ गोट्या अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने मंगळवार 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात अमन शेख, हार्दिक अशोक राणा आणि आनंदकुमार ऊर्फ मोनू सिंग यांचा समावेश आहे. या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शनिवारी रात्री पावणेदोन वाजता अंधेरीतील चकाला, साची बारसमोरील कार्डियल ग्रसियस रोडवर घडली. रामचंद्र हा अंधेरी येथे राहत असून चालक म्हणून कामाला आहे. रामचंद्र हा त्याच्या मित्रांसोबत एका बारमध्ये नियमित जात होता. तिथेच आरोपीदेखील जात होते. बारच्या एका बारबालेच्या प्रेमसंबंधातून रामचंद्र याचे आरोपीशी वाद झाला होता. शनिवारी रात्री पावणेदोन वाजता रामचंद्र हा त्याचा निलेशसोबत साची बारसमोरील कार्डियल ग्रसियस रोडवर होता. यावेळी तिथे यश, शिवकुमार आणि त्याचे इतर सहकारी आले होते. बारबालेवरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले होते.
यावेळी रामचंद्र आणि निलेश यांच्यावर पाचही आरोपींनी धारदार पट्ट्यासारख्या हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात रामचंद्र आणि निलेश हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर पाचही आरोपी तेथून पळून गेले होते. ही माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रामचंद्रच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना यश चलावणे आणि शिवकुमार सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली तर त्यांचे तीन सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.