वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी 43 लाखांचा अपहार करुन फसवणुक
फसवणुकीनंतर पळालेल्या व्यावसायिकाला तीन महिन्यांनी अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी सुमारे 43 लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी संतोष सुरेश सिंग या आरोपी व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. बिहार येथे कंपनीचे नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी, मुलीच्या शिक्षणासह इतर कामासाठी संतोषने तक्रारदार व्यावसायिकाकडून 43 लाख रुपये घेऊन या पैशांचा अपहार करुन पैशांची मागणी केल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
अमीत नंदकुमार नाळेकर हे बोरिवलीतील पद्मानगर परिसरात राहत असून त्यांची स्विप्ट रोडवेझ आणि स्विप्ट एक्स्रप्रेस नावाची पार्टनरशीपमध्ये खाजगी कंपनी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची संतोष सिंगशी ओळख झाली होती. यावेळी त्याने तो व्यावसायिक असल्याचे सांगून त्याचा शिप ब्रेकिंग, ऑईल आणि मेटल स्क्रॅपचा व्यवसाय आहे, या व्यवसायातून त्याला चांगला फायदा होत असल्याचे सांगितले होते. तो इतर व्यावसायिकाच्या मदतीने वेगवेगळे व्यवसाय असल्याचे चित्र निर्माण करुन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना काळात त्याला त्याच्या व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने त्यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी सुमारे पाच लाख रुपये दिले होते, ही रक्कम त्याने त्यांना एका महिन्यांत परत केली होती.
2022 रोजी त्याचा शिप ब्रेकिंगचा व्यवसाय बंद पडला होता, त्यामुळे त्याला दुसरा नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या स्विफ्ट एक्प्रेसची बिहार येथे नवीन कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तिथे कार्यालय सुरु केल्यास त्यांना नक्की फायदा होईल असे सांगितले होते. त्यांच्या कंपनीची बिहारमध्ये कुठलीही शाखा नव्हती, त्यामुळे त्यांना त्याचा प्रस्ताव आवडला. त्यामुळे त्यांनी त्याला नवीन शाखेच्या कार्यालयासाठी 19 लाख रुपये दिले होते. मात्र त्याने बिहारला कार्यालय सुरु न करता त्याच्या कार्यालयातून बिहारचे कंपनीचे कामकाज पाहत असल्याचे समजले. चौकशीनंतर संतोषने त्याच्या कर्जाच्या परतफेडीसाठी ही रक्कम वापरल्याची कबुली दिली.
याच दरम्यान त्याने त्यांच्याकडून त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी पावणेसोळा लाख आणि इतर कामासाठी सव्वाआठ लाख रुपये घेतले होते. अशाच प्रकारे त्यांनी त्याला नवीन कार्यालयासह मुलीच्या शिक्षणासह इतर कामासाठी सुमारे 43 लाख रुपये घेतले होते. मात्र वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले, त्यांचे फोन ब्लॉक केले होते. पैशांची मागणी केली म्हणून त्यांना अमीत नाळेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. संतोष सिंगकडून फसवणुक झाल्याने लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी संतोष सिंगविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या संतोष सिंगला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.