ट्रॅव्हेल्स बसच्या धडकेने 23 वर्षांच्या रिक्षाचालकाचा मृत्यू
अपघातानंतर बसचालकाचे घटनास्थळाहून पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या ट्रॅव्हेल्स बसच्या धडकेने एका 23 वर्षांच्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. नितिशकुमार चंद्रिका साह असे या मृत रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्या अपघातप्रकरणी गणेश ट्रॅव्हेल्स या खाजगी बसच्या चालकाविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळाहून पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात सोमवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वाकोला ब्रिजखालील हंसभुजा जंक्शनजवळ झाला. श्रवण वाल्मिकी साह हा विलेपार्ले येथील नेहरुनगर, अर्जुन चाळीत राहतो. तो रिक्षाचालक म्हणून काम करत असून त्याची स्वतची रिक्षा आहे. मृत नितिशकुमार साह हा त्याचा चुलत भाऊ असून तो त्याच्यासोबत राहत होता. दिवसा श्रवण साह तर रात्रीच्या वेळेस नितीनकुमार रिक्षा चालक चालवत होता. रविवारी दिवसभर रिक्षा चालवून सायंकाळी सात वाजता श्रवण हा रिक्षा चालवून घरी आला होता. त्यानंतर नितीशकुमार हा रिक्षा घेऊन गेला होता.
रात्री साडेबारा वाजता तो वाकोला ब्रिजखालील हंसभुजा जंक्शनजवळ रिक्षा घेऊन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्या गणेश ट्रॅव्हेल्सच्या चालकाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली होती. या अपघातात नितीशकुमार हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच खैरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या नितिशकुमारला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा दिड वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्रत्यदर्शीच्या असलेल्या रिक्षाचालकांच्या जबानीवरुन नितीशकुमार हा रिक्षा घेऊन जात असताना त्याच्या रिक्षाला गणेश ट्रॅव्हेल्स बसच्या चालकाने धडक दिली होती. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता बसचालक तेथून पळून गेला होता. त्यामुळे श्रवण साह याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रॅव्हेल्स बसच्या चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून त्याचा चुलत भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.