विदेशात नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या महिलेस अटक

अनेक बेरोजगार तरुणांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 सप्टेंबर 2025
मुंबई, – मालाड येथे कंपनीचे कार्यालय थाटून विदेशात नोकरीच्या आमिषाने अनेक बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक कटातील एका वॉण्टेड आरोपी महिलेस मालाड पोलिसांनी अटक केली. एकता अविनाश आयरे ऊर्फ दृष्टी ऊर्फ मनिषा असे या महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहेत. याच गुन्ह्यांत तिचे दोन सहकारी असून त्यांची नावे अमन कमलमिया शेख आणि जिग्नेशकुमार राठवा अशी आहेत. या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या टोळीने बोगस व्हिसा आणि नोकरीचे नियुक्तीचे पत्र देऊन 38 बेरोजगार तरुणांची एक कोटी सात लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीनंतर ही टोळी कंपनीला टाळे लावून पळून गेल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दृष्यंत चव्हाण यांनी सांगितले.

मालाडच्या एका शॉपिंग मॉलमध्ये अमन शेख, जिग्नेशकुमार राठवा आणि एकता आयरे यांनी इतर आरोपींच्या मदतीने स्वतची एक बोगस कंपनी सुरु केली होती. या कंपनीने सोशल मिडीयावर विदेशात विविध पदासाठी मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात दिली होती. या जाहिरातीसोबत एक लिंक देण्यात आली होती. ती लिंक ओपन केल्यानंतर अनेकांनी त्यात चांगले रिव्ह्यू दिल्या होत्या. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच इतर शहरातील अनेक बेरोजगार तरुणांनी ऑनलाईन तर काहींनी प्रत्यक्षात कंपनीत येऊन विदेशातील संबंधित नामांकित हॉटेलमध्ये किचन स्टाफ, वाहनचालक, हाऊसकिपिंग, स्टोअर किपर, सुरक्षारक्षक आदी पदांसाठी अर्ज केले होते. या अर्जासोबत त्यांचे पासपोर्ट जमा करुन प्रोसेसिंग फी, नोंदणी शुल्क, व्हिसा, मेडीकलसह इतर कामासाठी कंपनीच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. काही दिवसांनी ठराविक तरुणांना व्हिसासह नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते.

या व्हिसासह नियुक्ती पत्राची शहानिशा केल्यानंतर त्यांना देण्यात आलेले सर्व दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या बेरोजगार तरुणांनी मालाडच्या कंपनीत धाव घेतली होती, मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना कंपनीच्या कार्यालयाला टाळून सर्व आरोपी पळून गेल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर जवळपास 38 तरुणांनी त्यांची एक कोटी सात लाखांची फसवणुक झाल्याची मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. प्रत्येक उमेदवाराकडून नोकरीसाठी साडेचार ते पाच लाख रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी काही उमेदवारांना पूर्ण रक्कम तर काहींना अर्धी रक्कम देण्यातआली होती. काहींना पैसे न देता ते सर्वजण पळून गेले होते. या उमेदवारांच्या जबानीनंतर पोलिसांनी कंपनीच्या संबंधित आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दृष्यंत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या एकता आयरे या महिलेस पोलिसांनी अटक केली. चौकशीत एकता ही कंपनीत कामाला होती. तिच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करणयात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक दृष्यंत चव्हाण यांनी सांगितले. अटकपूर्व जामिनासाठी तिने विशेष सेशन कोर्टात अर्ज केला होता, मात्र तिचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page