सामान शिफ्ट करताना सोळा लाखांचे दागिने पळविले
पॅकर्स अॅण्ड मूव्हर्स कंपनीच्या कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 सप्टेंबर 2025
मुंबई, – मुंबईहून लोणावळा येथे सामान शिफ्ट करताना महत्त्वाच्या कागदपत्रांसह विविध सोन्याचे दागिने असलेली बॅग पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मॅक्स पॅकर्स आणि मूव्हर्स कंपनीच्या चार कर्मचार्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पप्पू, प्रदीपकुमार, खान आणि अजय अशी या चौघांची नावे असून या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
मानसी अशोक कुलकर्णी ही महिला वांद्रे येथील रिक्लेमेशन, कौस्तुभ इमारतीमध्ये राहत असून योगा शिक्षक म्हणून काम करते. तिला तिच्या घराचे काही सामान तिच्या वडिलांच्या लोणावळा येथील नागरगाव, राव कॉलनी, हरनाम कॉम्प्लेक्स येथे शिफ्ट करायचा होता. त्यामुळे तिने मॅक्स पॅकर्स आणि मूव्हर्सला ते सामान नेण्यासाठी कॉल केला होता. ठरल्याप्रमाणे 9 ऑगस्टला कंपनीने तिच्या घरी पप्पू, प्रदीपकुमार, खान आणि अजय नावाच्या चार कर्मचार्यांना पाठविले होते. ते सामान टेम्पोमध्ये लोड करुन ती टेम्पोमध्ये त्यांच्यासोबत लोणावळा येथे निघून गेली होती. यावेळी टेम्पोमध्ये चालकासह सातजण होते.
सामान पॅक करताना एका व्यक्तीने त्याच्या वडिलांचे जुने कपडे देण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला वडिलांचे कपडे आणि एक बॅग दिली होती. ही बॅग त्याने टेम्पोमध्ये ठेवले होते. यावेळी तिने एका बॅगेत मौल्यवान सामान असल्याचे सांगून त्याकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली होती. लोणावळा येथे जाताना एक कर्मचारी वाटेतच टेम्पोतून उतरला होता. त्यानंतर ते सर्वजण रात्री साडेनऊ वाजता लोणावळा येथे गेले होते. वडिलांच्या घरी सामान ठेवल्यानंतर 10 ऑगस्टला मानसी कुलकर्णी ही तिच्या घरी आली होती.
3 सप्टेंबरला ती मुंबईतून लोणावळा येथे गेली. बॅगेत तिचे महत्त्वाचे कागदपत्रे आणि दागिने होते, त्यामुळे तिने सर्व बॅगेची पाहणी केली असता तिला तिचे महत्त्वाचे सामान आणि सोन्याचे दागिने सापडे नाही. वडिलांच्या जुन्या कपड्याच्या बॅगेऐवजी कर्मचार्याने तिच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह सोन्याचे दागिने असलेली बॅग नेली होती. सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल कर्मचार्यांनी पळवून नेला होता.
हा प्रकार उघडकीस येताच तिने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या घरी आलेल्या पप्पू, प्रदीपकुमार, खान आणि अजय या चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपी मॅक्स पॅकर्स आणि मूव्हर्स कर्मचारी आहेत, त्यामुळे या सर्व कर्मचार्यांची पोलिसांकडून कसून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.