घातक शस्त्रांसह सराईत गुन्हेगाराला अटक
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 सप्टेंबर 2025
मुंबई, – घातक शस्त्रांसह धीरज सुरेंद्र उपाध्याय नावाच्या एका सराईत गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दृष्यंत चव्हाण यांनी सांगितले.
मालाड रेल्वे स्थानकाजवळ काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दृष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रफिक गवंडी, एच. जी. सय्यद व एटीएस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून धीरज उपाध्यायला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे सापडले. तपासात धीरज हा काहीच कामधंदा करत नाही. सध्या तो बोरिवलतील कार्टर रोड क्रमांक तीन, गोपाळ कृष्ण इमारतीमध्ये राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध समतानगर, कस्तुरबा मार्ग, एमएचबी पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे.
या चारही गुन्ह्यांत त्याच्याविरुद्घ आरोपपत्र सादर करण्यात आले असून सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दृष्यंत चव्हाण यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील ोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला तो कट्टा कोणी दिला, त्याने तो कट्टा कोठून आणला, या कट्ट्याचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का किंवा वापर होणार का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.