मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – बॉम्बच्या मेलमुळे पुन्हा मुंबई उच्च न्यायलयात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र न्यायालयाची संपूर्ण इमारतीची तपासणी केल्यानंतर यावेळेसही ही अफवा असल्याचे उघडकीस आले. सात दिवसांत मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बचा आलेला हा दुसरा मेल असून या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. याकामी सायबर सेल पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गेल्या शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला दिल्लीसह मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब असल्याचा एक मेल प्राप्त झाला होता. हा मेल न्यायालयीन कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून न्यायालयाची संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. त्यानंतर श्वान पथकासह बॉम्बशोधक व नाशक पथकाने इमारतीचा ताबा घेऊन तिथे तपासणी सुरु केली होती.
जवळपास दोन ते तीन तास संपूर्ण इमारतीची तपासणी केल्यानंतर तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. या घटनेला सात दिवस पूर्ण होत नाहीतर तोवर शुक्रवारी 19 सप्टेंबरला पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बचा दुसरा मेल आला होता. सकाळीच हा मेल न्यायालयीन कर्मचार्याचा लक्षात आले होते. त्यामुळे न्यायालयाच्या इमारतीची पुन्हा तपासणी करण्यात आली होती.
या तपासणीनंतर बॉम्बचा दुसरा मेलही अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु झाले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, सायबर सेल आणि एटीएसला तपासाचे आदेश दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.