आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाईत तीन प्रवाशांना अटक
20 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह विदेशी चलन जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – गेल्या दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वेगवेगळ्या कारवाईत तीन प्रवाशांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. यातील दोन प्रवाशांकडून सुमारे वीस कोटीचे हायड्रोपोनिक गांजा तर एका प्रवाशाकडून 26 लाख रुपयांचे विदेशी चलन या अधिकार्यांनी जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएससह विदेशी चलनाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज, सोने आणि विदेशी चलनाच्या होणार्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली होती. अशा तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गुरुवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. तो बँकाँकला जाण्यासाठी तिथे आला होता. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 26 लाख 37 हजार रुपयांचे विदेशी चलन सापडले. ते चलन त्याने ट्रॉली बॅगेत लपवून ठेवले होते. त्याच्याकडील चलन जप्त केल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
दुसर्या कारवाईत अन्य एका प्रवाशाला या अधिकार्यांनी त्याच्याकडून 9 किलो 981 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत 9 कोटी 98 लाख रुपये इतकी किंमत होती. ही कारवाई ताजी असताना अन्य प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात 10 किलो 81 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी आहे.
दोन्ही प्रवाशी बँकाँकहून गांजा घेऊन आल्याचे तपासात उघडकीस आले. या दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी 20 किलो 62 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे वीस कोटी रुपये आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.