कर्जाच्या आमिषाने व्यापार्‍याला गंडा घालणार्‍या ठगाला अटक

दहा लाखांच्या कर्जासाठी 33 लाखांची फसवणुक केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – कर्जाच्या आमिषाने एका इमिटेशन ज्वेलरी व्यापार्‍याची फसवणुक केल्याप्रकरणी विकास नवलकिशोर या 23 वर्षांच्या ठगाला दिल्लीतून उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. दहा लाखांचे कर्ज देतो असे सांगून तीनजणांच्या एका टोळीने त्यांची सुमारे 33 लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. विकास हा काही सायबर ठगांच्या संपर्कात असून फसवणुकीसाठी त्याने त्यांच्या सांगण्यावरुन बँकेत खाती उघडले होते. फसवणुकीची काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नरपतराम भुपाराम देवासी हे मालाड परिसरात राहत असून याच परिसरात त्यांचा इमिटेशन ज्वेलरी पॅकिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन कामगार कामाला आहेत. स्वतच्या व्यवसाय वाढीसाठी त्यांना दहा लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्यासाठी त्यांनी एक लोन अ‍ॅप डाऊनलोड केले होते. याच अ‍ॅपवर त्यांनी कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांना नितीनकुमार नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन त्यांच्याकडे कर्जाची आवश्यकता आहे का याबाबत विचारणा केली होती. त्याने तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या बीकेसी येथील कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले होते. त्यांनी होकार दर्शविताच त्याने अल्पावधीत कमीत कमी व्याजदरात दहा लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या मागणीनुसार त्यांनी त्याला त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे स्टेटमेंट आणि फोटो पाठविले होते.

काही दिवसांनी त्यांना मुद्रा कंपनीकडून कर्ज प्राप्त झाल्याचे एक पत्र व्हॉटअपवर पाठविण्यात आले होते. या पत्रानंतर तयांनी चार्जेस रक्कम म्हणून त्याला दिड हजार रुपये पाठवून दिले होते. त्यानंतर त्याच्याशी वेगवेगळ्या व्यक्तींनी संपर्क साधून ते स्टेट बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगत होते. कर्जासाठी विविध प्रोसेसिंग फीसह विविध कारण सांगून त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. 10 जून ते 17 जून 2025 या कालावधीत त्यांनी त्यांना 9 लाख 53 हजार 177 रुपये पाठविले होते. इतर कामासाठी त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करण्यात आली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रासह भाऊ आणि नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या बँक खात्यात 4 लाख 63 हजार 251 रुपये ट्रान्स्फर केले होते. 26 जूनला लास्ट ट्रान्सर्झेशन केल्यानंतर संबंधित दोन्ही व्यक्तींनी त्यांचे मोबाईल बंद झाले होते. त्यांच्या स्कॅनरवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यापैकी एक मोबाईल सुरु होता. त्यामुळे त्यांनी तिथे संपर्क साधला होता.

यावेळी दयाशंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने तो रिलायन्स फायानान्स विभागाचा लोन रिकव्हरी कर्मचारी अस्याचे सांगितले. त्यांनी त्याला घडलेला प्रकार सांगून त्यांची फसवणुक झाल्याबाबत तक्रार केली होती. यावेळी दयाशंकरने त्यांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडे विविध कारणासाठी पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासह त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला टप्याटप्याने 18 लाख 73 हजार 700 रुपये पाठविले होते. मात्र त्यानेही त्यांना कर्ज मिळवून दिले नाही तसेच फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिली नाही. दहा लाखांच्या कर्जासह फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन अज्ञात सायबर ठगांनी त्यांची सुमारे 33 लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्यांच्या तक्रारीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यात आली होती. त्यापैकी विकासच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले होते. ही माहिती उघडकीस येताच प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार सावंत, वसईकर, पाटील आणि नाडगौडा या पोलीस टिमने शुक्रवारी दुपारी दिल्लीत जाऊन विकासला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत विकास हा दिल्लीतील नॉर्थ वेस्ट, शाबाद डेअरी, डी/678 मध्ये राहतो. तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्याने त्यांच्यासाठी बँकेत खाते उघडले होते. याच बँक खात्याची माहिती सायबर ठगांना माहिती दिल्यानंतर त्याच्या खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर होत होती. ही रक्कम नंतर तो संबंधित ठगांना ट्रान्स्फर करत होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून येणार्‍या माहितीनंतर इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page