चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय बदलून मोबाईल विक्रीचा पर्दाफाश
पवई येथून शॉपमालकासह कर्मचार्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय बदलून मोबाईल विक्री करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका शॉपमालकासह त्याच्या कर्मचार्याला पवई येथून पोलिसांनी अटक केली. रामप्रसाद सरगुन राजभर आणि गुलाम रसुल रशीद खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही साकिनाका परिसरातील रहिवाशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक सीपीयु, एक डेल एलसीडी स्क्रिन, एक माऊस, एक किबोर्ड, एक एअरटेल राऊटर, चार विविध कंपनीचे जुने मोबाईल, 2 हजार 600 रुपयांची कॅश, दोन्ही आरोपींचे दोन मोबाईल असा 84 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने मंगळवार 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवईतील साकिनाका, साकिविहार रोडच्या तुंगागावात राम मोबाईल सर्व्हिस सेंटर आहे. या सर्व्हिस सेंटरमध्ये चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याच मोबाईलची स्वस्तात काही ग्राहकांना विक्री केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे एका बोगस ग्राहकाला मोबाईलच्या आयएमईआय बदलण्यासाठी पाठविले होते. यावेळी शॉपच्या कर्मचार्याने काही मिनिटांत त्याला मोबाईलचे आयएमईआय बदलून दिले होते.
हा प्रकार उघडकीस येताच नंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, सहाय्यक फौजदार देसाई, पोलीस हवालदार चव्हाण, माळवेकर, पांचाळ, बैलकर, पोलीस शिपाई ससाने, पोलीस हवालदार चालक कदम, बागल यांनी तिथे छापा टाकून राजप्रसाद राजभर आणि त्याचा कर्मचारी गुलाम खान याला अटक केली होती.
तपासात या सर्व्हिस सेंटरचा राजप्रसाद हा मालक असून गुलाम हा त्याच्याकडे चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय बदलण्याचे काम करत होता. गुगल क्रॉम येथून अनलॉक टूलच्या सहाय्याने तो आयएमईआय बदलत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर या दोघांसह त्यांच्याकडे आलेल्या इतर चार असे सहा मोबाईल, एक सीपीयु, एलसीडी स्क्रिनसह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आतापर्यंत किती चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलले आहेत, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.