पवई येथे 19 वर्षांच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीचाही आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – पवई येथे राहणार्‍या श्रवण विनोद शिंदे या 19 वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रवणच्या आत्महत्येनंतर त्याच परिसरात राहणार्‍या त्याच्या प्रेयसीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पार्कसाईट पोलिसांनी वेळीच तिच्या घरी जाऊन तिला आत्महत्या करण्यापासून प्ररावृत्त केले. तिच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रवणच्या आत्महत्येप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी एडीआरची नोंद करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दुजोरा दिला आहे.

ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता पवईतील महात्मा फुले नगर, आयआयटी मार्केटच्या सिद्धार्थ चाळीत घडली. याच चाळीच्या 122 मध्ये श्रवण शिंदे हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. शनिवारी दुपारी अडीच वाजता घरात कोणीही नसताना त्याने लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्याच्या पालकांनी त्याला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सायंकाळी पावणेचार वाजता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. चौकशीत श्रवणचे त्याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीसोबत प्रेमसंंबंध होते.

श्रवणच्या आत्महत्येनंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेयसीला शिवीगाळ केली होती. श्रवणच्या आत्महत्येच्या वृत्ताने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिनेही तिच्या राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने स्वतला आतून कडी लावून कोंडून घेतले होते. ही माहिती बीट मार्शल पोलीस हवालदार ठोकळ, बीट स्पेशल ससाणे यांना समजताच त्यांनी मुलीच्या घरी जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांना ती आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन तिचा जीव वाचवून समयसूचकपणे काम केले होते. या दोन्ही घटनेची पार्कसाईट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठांकडून पार्कसाईट पोलिसांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page