म्हाडा फ्लॅट देतो असे सांगून दोन महिलांसह तिघांची फसवणुक
70 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – म्हाडाचा फ्लॅट देतो असे सांगून दोन महिलांसह तिघांची सुमारे 70 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपी महिलेसह तिघांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बेला डिसुजा, गिरीश राव आणि जितेंद्र राठोड अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून आरोपींच्या अटकेनंतर या आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील बेला ही मुख्य आरोपी असून तिला अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने पुन्हा अशा प्रकारे फसवणुक सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सारा जोखीम फर्नाडिस ही 50 वर्षांची महिला माझगाव येथे तिचे पती आणि दोन मुलांसोबत राहते. तिचे पती एका खाजगी कंपनीत तर सारा ही भायखळा येथील एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ती नियमित मेट्रो सिनेमाजवळील एका चर्चमध्ये जात होती. तिथेच तिची तिच्या एका मैत्रिणीने बेलाशी ओळख करुन दिली होती. ती म्हाडामध्ये काम करत असून तिची म्हाडामधील वरिष्ठ अधिकार्यांसह म्हाडाच्या इमारतीचे बांधकाम करणार्या काही बिल्डरांशी तिचे चांगले संबंध आहे. त्यांना मिळणार्या कोट्यातून ती तिला म्हाडाचे एक स्वस्तात फ्लॅट देईल असे सांगितले होते. ताडदेव येथे म्हाडाचे काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असून तिला तीस लाखांमध्ये तो फ्लॅट मिळेल. तिने दहा लाखाचे पेमेंट केल्यानंतर तिला उर्वरित वीस लाखाचे गृहकर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याने तिने त्यास होकार दिला. बेलाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर एप्रिल 2013 ते 6 डिसेंबर 2018 या कालावधीत तिने गिरीश राव आणि स्टॅनली सॅबस्टिनो यांच्यामार्फत बेलाला सुमारे 25 लाखांचे पेमेंट केले होते. याच दरम्यान तिला तिच्या परिचित वेनेसा रॉड्रिग्ज, कोरा मेन्डनोका यांनीही बेलाकडे प्रत्येकी एक म्हाडाचे फ्लॅट बुक केले होते. त्यासाठी या तिघांना वेनेसा यांनी 28 लाख 59 हजार तर कोरा हिने 16 लाख 44 हजार रुपये दिले होते. जून 2019 रोजी बेलाने तिला म्हाडाचे फ्लॅट मिळाल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर सारा ही तिचे पती जोखीम यांच्यासोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. यावेळी जितेंद्र राठोड याने त्यांना लवकरच फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले.
काही दिवसांनी गिरीश आणि जितेंद्रने साराला वायोमेट्रीक पडताळणीसाठी म्हाडा कार्यालयात बोलाविले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही तिला लवकरच फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. जानेवारी 2023 रोजी सारा फर्नाडिसला बेला डिसुझा हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत ती सध्या जेलमध्ये असल्याचे समजले होते. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने तिच्याकडील म्हाडाच्या फ्लॅटच्या पत्राबाबत म्हाडा कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. यावेळी तिला तिच्याकडील पत्र बोगस असल्याचे समजले होते.
तिने जेलमधून जामिनावर आलेल्या बेलासह गिरीश आणि जितेंद्रकडे पैशाबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांनी तिला पैसे दिले नाही. अशा प्रकारे बेलासह गिरीश आणि जितेंद्र यांनी म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून या तिघांकडून 70 लाख रुपये घेतले होते, मात्र तिघांपैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा न देता फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. या प्रकारानंतर सारा फर्नाडिस हिने शिवाजी पार्क पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. याा तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बेला डिसुझा, गिरीश राव आणि जितेंद्र राठोड या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.