स्टेट बँकेच्या निवृत्त कर्मचार्याची 28 लाखांची फसवणुक
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घातल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – स्टेट बँकेच्या एका वयोवृद्ध कर्मचार्याची अज्ञात सायबर ठगाने सुमारे 28 लाखांची फसवणुक केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरु केला आहे. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
68 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अनंत शांताराम जोशी हे विलेपार्ले येथे त्यांच्या पत्नीसोबत राहतात. ते स्टेट बँकेतून निवृत्त झाले असून त्यांना बँकेतून पेंशन येते. 17 जूनला त्यांना सुमन गुप्ता नावाच्या एका महिलेचा फोन आला होता. तिने आनंद राठी या प्लॅटफॉर्मवर कस्टमर सर्व्हिस म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने त्यांच्या कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपवर त्यांचा मोबाईल जोडले होते. या ग्रुपमध्ये त्यांना शेअरसंदर्भातील माहिती दिली जात असल्याचे दिसून आले.
ग्रुपमधील अनेक सभासदांनी विविध शेअरमध्ये गुंतवणुक केली होती, या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसत होते. तिने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांना एक अॅप पाठविण्यात आले होते. या अॅपमध्ये त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स घेण्यात आली होती. या माहितीनंतर त्यांनी काही शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. त्यात त्यांना 63 हजार रुपयांचा फायदा झाला होता.
ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी विविध शेअरमध्ये 22 जून ते 5 जुलै 2025 या कालावधीत सुमारे 27 लाख 88 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना 96 लाख रुपये प्रॉफिट झाल्याचे कंपनीच्या एआर ट्रेड मोबी अॅपवर दिसत होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना काही दिवसांनी त्यांना ही रक्कम ट्रान्स्फर करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांना संबंधित रक्कमेवर टॅक्स भरावा लागणार नाही असे सांगण्यात आले.
काही दिवसांनी कंपनीचे कर्मचारी त्यांना टॅक्ससह इतर कामासाठी पैसे भरण्यास सांगण्यात होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या सहकार्यांशी चर्चा केली होती. यावेळी त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर सेल हेल्पलाईनसह पश्चिम सायबर सेल विभागात घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित खातेदारांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.