सहा वर्षांच्या मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक
कोणाला सांगू नकोस नाहीतर गटारात फेंकून देण्याची धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – सहा वर्षांच्या अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 22 वर्षांच्या आरोपी तरुणाला वडाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुझी हत्या करुन मृतदेह गटारात फेंकून देण्याची धमकीच त्याने पिडीत मुलीला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
37 वर्षांची तक्रारदार महिला ही वडाळा परिसरात राहत असून बळीत तिची सहा वर्षांची मुलगी आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ती तिच्या घरासमोरच खेळण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे आरोपी तरुण आला आणि त्याने तिला घराजवळील गल्लीत नेले. तिथेच त्याने तिच्याशी चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझी हत्या करुन तुझा मृतदेह गटारात फेंकून देईन अशी धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी आली. तिला घाबरलेल्या अवस्थेत पाहून तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला.
या घटनेनंतर तिने वडाळा पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आरोपी आणि बळीत मुलगी एकाच परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.