चेंबूर येथे दोनशे रुपये दिले नाही म्हणून चाकूने भोसकले
रेकॉर्डवर गुन्हेगार असलेला ढोर्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – दोनशे रुपये दिले नाही म्हणून भरस्त्यात एका 43 वर्षांच्या व्यक्तीच्या डोक्याने चाकूने वार करण्यात आल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात राजकुमार नंदलाल जैस्वाल हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या स्वप्निल अडसूळ ऊर्फ ढोर्याला चेंबूर पोलिसांनी अटक केली. ढोर्याविरुद्ध विविध पोलीस अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी दुपारी एक वाजता चेंबूर येथी के. एन गायकवाड रोड, सिद्धार्थ कॉलनीतील मेन गेटसमोर घडली. याच परिसरातील सिद्धार्थ नगरात राजकुमार जैस्वाल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. रविवारी दुपारी एक वाजता ते किराणा सामान घेण्यासाठी दिपक जनरल स्टोरजवळ आले होते. यावेळी तिथे ढोर्या आला. त्याने त्यांच्याकडे दोनशे रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा रागा आल्याने त्याने त्यांना हाताने-लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्याकडील चाकूने त्यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.
हल्ल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. जखमी झालेल्या राजकुमारला स्थानिक लोकांनी तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन त्यांनी चेंबूर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ढोर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या ढोर्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. ढोर्या हा सिद्धार्थ कॉलनीत राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात सात, नेहरुनगर पोलीस ठाण्यात चार आणि देवनार पोलीस ठाण्यात एक अशा बाराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर दोन वर्षांसाठी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.