वयोवृद्ध व्यावसायिकाच्या हत्येमागे पार्टनरसह मुलाचा सहभाग
हत्येची साडेसहा लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील कार्यालयात प्रवेश करुन मोहम्मद आयुब मोहम्मद युनूस सय्यद या 67 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर चारकोप पोलिसांना यश आले आहे. या हत्येमागे व्यावसायिक पार्टनरसह मुलाचा सहभाग उघडकीस आले असून या दोघांनी दोन मारेकर्यांना हत्येची साडेसहा लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाखांचा पहिला हप्ता मारेकर्यांना देण्यात आला आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर व्यावसायिक पार्टनर शानू मुस्ताक चौधरी, हत्या झालेल्या व्यावसायिकाचा मुलगा मोहम्मद हनीफ मोहम्मद आयुब सय्यद आणि एक मारेकरी मोहम्मद खैरुल इस्लाम कादिर अली अशा तिघांना चारकोप पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत दुसरा मारेकरी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आर्थिक आणि प्रॉपटीच्या वादातून मोहम्मद आयुबची हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
मोहम्मद आयुब हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथील लिंक रोड, शिवधाम सोसायटीमध्ये राहत होते. त्यांचा कांदिवलीतील चारकोप, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सनवर्मल दुर्गादत्त नावाची एक ग्लास टफनिंग करण्याची कंपनी होती. या कंपनीचे सर्व व्यवहार मोहम्मद आयुब हे त्यांचा लहान मुलगा हनीफ सय्यद याच्यासोबत पाहत होते. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची कंपनी होती. त्यामुळे त्यांनी ती जागा भाड्याने देण्याचा व्यवहार सुरु केला होता. रविवारी सकाळी अकरा वाजता मोहम्मद आयुब हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात आले होते. याच दरम्यान तिथे दोन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला आणि मोहम्मद आयुब यांची गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर दोन्ही मारेकरी तेथून पळून गेले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
रक्तबंबाळ झालेल्या मोहम्मद आयुब यांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्यांचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी दोन्ही मारेकर्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींचा शोध सुरु असताना शानू चौधरी याला नवी मुंबईतील नेरुळ, मोहम्मद हनीफ याला सीवूड तर मोहम्मद खैरुल याला कांदिवलीतील चारकोप, भाबरेकर नगर परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत शानू चौधरी हा मोहम्मद आयुब यांचा व्यावसायिक पार्टनर होता. त्याने त्यांच्या कंपनीत काही रक्कमेची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा हिस्सा त्याला मोहम्मद आयुब देत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात काही दिवसांपासून पैशांवरुन वाद सुरु होता.
दुसरीकडे हनीफ सय्यद हा मोहम्मद आयुब यांचा लहान मुलगा आहे. त्याला त्याच्या घरासह मालमत्तेचे हिस्सा मिळत नव्हता. या हिस्स्यावरुन त्याचे त्याचे वडिल मोहम्मद आयुबसोबत वाद सुरु होता. याच वादातून शानू आणि हनीफने मोहम्मद आयुबची हत्या करण्याची योजना बनविली होती. त्यासाठी त्यांनी मोहम्मद खैरुल व त्याच्या मित्राला मोहम्मद आयुबच्या हत्येची सुपारी दिली होती. साडेसहा लाखांमध्ये ही सुपारी दिल्यानंतर त्यांनी मोहम्मद खैरुलला आगाऊ म्हणून एक लाख रुपये दिले होते.
ठरल्याप्रमाणे मोहम्मद खैरुल हा त्याच्या मित्रासोबत रविवारी सकाळी मोहम्मद आयुब यांना भेटण्यासाठी त्यांच्या कांदिवलीतील चारकोप येथील कार्यालयात आले होते. तिथे त्यांच्याशी काही वेळ संभाषण केल्यानंतर या दोघांनी त्यांची गळ्यावर वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर ते दोघेही पळून गेले होते. काही वेळानंतर त्यांनी मोहम्मद हनीफ आणि शानू चौधरीला काम फत्ते झाल्याची माहिती दिली होती. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी हत्येतील दोन्ही मुख्य सूत्रधारासह मुख्य मारेकर्याला अटक केली. या गुन्ह्यांतील दुसरा मारेकरी पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, विलास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिग्विजय पाटील, कोळेकर, थोरात, धनंजय आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पवार, आंबेकर, पोलीस हवालदार तटकरे, पाटेकर, शिंदे, पोलीस शिपाई गायकवाड यांनी केली.