वयोवृद्धांना गोड बोलून दागिने पळविणार्या टोळीचा पर्दाफाश
दोन आरोपींना अटक; एका आरोपीविरुद्ध 81 गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – गोड बोलून रस्त्यावरुन जाणार्या पादचार्यांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटणार्या एका टोळीचा जोगेश्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. रमेश विजयकुमार जैस्वाल आणि निलेश चंद्रकांत घाग अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून रमेशविरुद्ध मुंबईसह ठाणे मिरा-भाईंदर येथील विविध पोलीस ठाण्यात 81 तर निलेशविरुद्ध पाच गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या अटकेने मुंबईसह ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
किस्तुरा उदाराम चौधरी हे 70 वर्षांचे तक्रारदार प्रॉपटी एजंट असून ते जोगेश्वरी परिसरात राहतात. मंगळवार 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेचार वाजता ते जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळील बेस्ट बसस्टॉपसमोरुन जात होते. यावेळी तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपयांची पुखराज आणि लाल रंगाची भुंगा खडा असलेली दोन सोन्याची अंगठी पाकिटात ठेवण्याचा सल्ला दिला होता. या दोन्ही अंगठ्या त्यांनी पाकिटात ठेवल्यानंतर त्यांनी हातचलाखीने साडेतीन लाखांच्या दोन्ही अंगठ्या घेऊन तेथून पलायन केले होते. हा प्रकार नंतर किस्तुरा चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी जोगेश्वरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गेल्या काही दिवसांत गोड बोलून बतावणी करुन लुटमारीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. संबंधित आरोपी रस्त्यावर जाणार्या वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील दागिने लुटमार करत असल्याने त्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक चारु भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील, नागेश मिसाळ, विनोद लाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव तोडणकर, पोलीस हवालदार अनिल जैतापकर, शिवाजी कोळेकर, पांडुरंग वाघमोडे, राकेश कांबळे, बाळसाहेब सानप, कृष्णा चव्हाण, मनोज पाटील, विशाल पिसाळ यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एका आरोपीची ओळख पटली होती. हा धागा पकडून पोलिसांनी रमेश जैस्वाल आणि नंतर निलेश घाग या दोघांना पुण्यातील हवेली येथून शिताफीने अटक केली. चौकशीत त्यांनीच किस्तुरा चौधरी यांचे साडेतीन लाखांच्या दोन अंगठ्या फसवणुक करुन पळवून नेल्याची कबुली दिली. या दोघांच्या अटकेने अशा प्रकारच्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात वाकोला, बोरिवली, कोळसेवाडी, महात्मा फुले, बाजारपेठ, रामननगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी वाकोला आणि जोगेश्वरीतील गुन्ह्यांतील शंभर टक्के चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोड बोलून वयोवृद्धांकडील दागिने लुटण्याच्या गुन्ह्यांतील दोन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रमेश जैस्वालविरुद्ध मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदरच्या विविध पोलीस ठाण्यात बतावणी करुन फसवणुकीचे 81 गुन्हे दाखल आहे तर निलेशच्या अटकेने पाच गुन्ह्यांची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.