पत्नीची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला अटक
गावी जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून केली होती हत्या
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – पत्नीची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला चारकोप पोलिसांनी अटक केली. दसा बैलोचन राणा या 34 वर्षांच्या आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गावी जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दसाने त्याची पत्नी हिमेंद्री दसा राणा हिची गळा आवळून हत्या केली होती.
दसा हा त्याची पत्नी हिमेंद्री हिच्यासोबत कांदिवलीतील चारकोप, सेक्टर तीन, चारकोप डेपोजवळील रामविजय सहकारी सोसायटीच्या बांधकाम साईटवर कामगार म्हणून कामाला होता. गेल्या एक वर्षांपासून ते दोघेही इतर कामगारांसोबत तिथे काम करत होते. दिवसा काम करुन ते रात्रीच्या वेळेस तिथेच झोपत होते. दसाला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यातून त्याचे त्याच्या पत्नीसोबत सतत खटके उडत होते. रविवारी 21 सप्टेंबरला रात्री एक वाजता दसाने हिमेंद्रीकडे गावी जाण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून दसाने त्याची पत्नी हिमेंद्रीची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. या माहितीनंतर इमारतीचा मुकादम लालप्पा गुंडीवाला याला समजताच त्याने ती माहिती चारकोप पोलिसांना दिली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी हिमेंद्रीला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
तपासात हिमेंद्रीच्या मुलाने त्याच्याच वडिलांनी आईला पैशांवरुन मारहाण करुन तिची कपड्याने गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले. हा संपूर्ण प्रकार त्याच्यासमोर झाला होता. त्यामुळे तो प्रचंड घाबरला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी दसा राणाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपी पतीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गावी जाण्यासाठी झालेल्या पैशांच्या वादातून त्याने हिमेंद्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.