पोलीस असल्याची बतावणी करुन लुटमार करणार्या दुकलीस अटक
तोतयागिरी करुन फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन एका वयोवृद्ध महिलेकडील सुमारे दोन लाखांचे सोन्याचे बांगड्या घेऊन पळून गेलेल्या एका दुकलीस चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. शाहिद जावेदअली जाफरी आणि काबुलअली नौशादअली जाफरी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन लुटमार करणारी ही इराणी टोळीने असून त्यांच्या अटकेने तोतयागिरी करुन फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
गोदावरी नरेंद्र सिंह ही 70 वर्षांची तक्रारदार महिला मालाड परिसरात राहते. तिचा मुलगा विरेंद्र हा त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत दुबई येथे राहत असून तेथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. विवाहीत मुलगी कांदिवली येथे राहत असून तिचे पती लंडन येथे कामानिमित्त ये-जा करतात. तिची मुलगी लंडन येथे राहत असल्याने ती तिच्याच कांदिवलीतील घरी राहत होती. 10 जूनला सकाळी पावणेदहा वाजता ती तिच्या सोसायटीच्या गेटसमोरच गायीला जेवण देण्यासाठी गेली होती. जेवण देऊन ती घराच्या दिशेने जात होती. यावेळी तिच्याकडे बाईकवरुन दोन तरुण आले. त्यांनी तिला पोलीस असल्याचे सांगून या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने तिच्या हातातील बांगड्या एका रुमालात काढून ठेवल्या होत्या.
या दोघांनी तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करुन हातचलाखीने तिच्याकडील सोन्याचे बांगड्या घेऊन पलायन केले होते. काही अंतर गेल्यानंतर तिला तिच्या बांगड्या दिसल्या नाही. पोलीस असल्याची बतावणी करुन गोड बोलून दोन्ही तोतया पोलिसांनी तिचे बांगड्या चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती.
सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या शाहिद जाफरी आणि काबुलअली जाफरी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.